आज ऑक्टोबर १८ २०२३, ताई मावशीला जाऊन वीस वर्षें झाली.
"कोल्हापूर नावाच्या गावास: पाऊले जरी दूर भटकत गेली/ तरी तुझ्या जुन्या आठवणींची बुत्ती / सतत जवळ राहिली आहे" (हे मी महान लेखक जी. ए. कुलकर्णींच्या 'रमलखुणा' या पुस्तकाच्या अर्पण पत्रिकेत बदल करून घेतले आहे.)
एखाद्या शहरासोबत माणसाचे नाते कसे प्रस्थापित होते आणि वृद्धिंगत होते याचा अभ्यास खूप इंटरेस्टिंग आहे. त्या नात्याला अनेक पैलू असतात.
मी भारतातील डुमडुमा-आसाम , मिरज, मुंबई, ठाणे , नवी मुंबई, नाशिक, बेंगरुळू, पुणे, कोलकता, चेन्नई वगैरे शहरात राहिलो आहे... भारतात आणि अनेक देशातील शहरांना काम / विरंगुळा निमित्त भेटी दिल्या आहेत. मी परदेशात तर कधीच रमलो नाही आणि भारतात कोल्हापूर माझ्या साठी शहर नंबर १ आहे... हे म्हणणे सोपे पण तसे का याचा विचार गुंतागुंतीचा आहे.
एक उत्तर आहे- माझ्या लहानपणात आणि पौगंडावस्थेत कोल्हापूरात बघितलेले सिनेमे.
अलीकडील बऱ्याच लोकांना, सिनेमाचे माझ्या आणि माझ्या आधी/ नंतरच्या पिढ्यांच्या जीवनातील केंद्रीय स्थान लक्षात कधीच येणार नाही. सिनेमा आणि त्याचे संगीत हे नुसती करमणूक नव्हती तर तो संस्कृतीचा एक प्रमुख भाग होता. त्याकाळातील विद्वत्ताप्रचुर लेख तुम्ही वाचले तर ते तुम्हाला कधीच समजणार नाही. त्यासाठी तुम्हाला त्याकाळातील लोकांशी बोलले पाहिजे. "सिनेमा सिनेमा" नावाचा एक सिनेमा १९७९ साली प्रदर्शित झाला होता, त्यात मी जे इथे म्हणतो त्याचे थोडे प्रतिबिंब पडले होते.
मी कोल्हापूरात बघितलेल्या अनेक सिनेमांपैकी फक्त चार हिंदी सिनेमांची नावे इथे घेणार आहे- ऍन इव्हनिंग इन पॅरिस, १९६७; आराधना, १९६९; जॉनी मेरा नाम, १९७०; कटी पतंग, १९७१...
ऍन इव्हनिंग इन पॅरिस बहुतेक व्हीनसला ३-६ चा शो बघितला होता --प्रचंड गर्दी, वरती काटेरी तारा ठोकलेल्या क्यू मध्ये वाट पाहणे , कडक उन्हाळा, चालत मावशीच्या घरापासून थिएटर पर्यंत केली उन्हातील रपेट वगैरे ---पण ज्यावेळी शम्मी कपूर वारले, त्यावेळी पहिल्यांदा काय आठवले तर ती १९६७-६८ ची दुपार .... आज केंव्हाही त्या सिनेमातले सदाबहार गाणे ऐकल्यावर किंवा हिंदी सिनेमातील सर्वात सुंदर दिसणारी बिकिनी ज्यांनी त्या सिनेमात घातली त्या दिसल्यावर काय आठवते तर, कोल्हापूर... थोडक्यात ऍन इव्हनिंग इन पॅरिस बद्दलच्या सगळ्या चांगल्या गोष्टी कोल्हापूर या नावाला ट्रान्सफर झाल्या!
तीच गोष्ट साधारणपणे इतर तीन सिनेमांच्या बाबत म्हणता येईल. हिंदी सिनेमे कोल्हापूर नंतर कित्येक महिन्यांनी मिरजेला येत असत. जॉनी मेरा नाम बघून ज्यावेळी मी परतलो त्यावेळी कित्येक महिने मी त्याची साग्रसंगीत गोष्ट (पद्मा खन्ना यांच्या नाचासकट!) मित्रांना सांगून भाव खाल्ला होता.
कटी पतंग चे संगीत इतके सुपरहिट झाले होते की मावशीच्या घराजवळ मला एक दोन गाण्यांचे मराठीत केले गेलेले विडंबन पण ऐकू येई.
ज्या दिवशी मावशी गेली त्यादिवशी तिच्या अंत्यदर्शनाला मी संध्याकाळी कोल्हापुरात पोचलो. विधी झाल्यानंतर सहज आकाशाकडे लक्ष गेले. इतके सुंदर होते आकाश की पहिले आठवले कटी पतंग मधले गाणे : “ये शाम मस्तानी...”
चिं.त्र्यं.खानोलकर त्यांच्या एका दीर्घ कथेत लिहतात : "....आणि आकाशाकडे बघून त्याने गर्जना केली : बाप्पा तुला क्षमा नाही. वाड्यावरची माणसे दोंदे वाढवतात. माझ्या काश्याचे पाय जातात. चाफा मात्र फुलतच राहतो....". पहिल्यांदा खानोलकरांसारखा बाप्पाचा राग आला, पण नंतर वाटले माझ्या मावशीला ती कदाचित योग्य श्रद्धांजली होती. आज केंव्हाही मस्तानी शाम म्हणजे पहिल्यांदा माझ्या मावशीच्या कोल्हापूरची...
शम्मी कपूर, शर्मिला टागोर, ऍन इव्हनिंग इन पॅरिस, १९६७