सध्या आखाती युद्धामुळे घरगुती वापराच्या गॅसबद्दल X वर तुफान चर्चा चालू आहेत.
आज मी सुद्धा गॅसला नंबर लावला आहे. बघू काय होते ते. पण ह्या सगळ्यामुळे मला १९७० च्या दशकाची आठवण झाली.
त्या दशकाच्या सुरुवातीला आमच्या घरात स्वयंपाकासाठी चार साधने होती — एक शेगडी, एक चूल, एक वातीचा रॉकेल स्टोव्ह आणि एक आवाजाचा रॉकेल स्टोव्ह. जवळच्या वखारीत सांगितले की कोळशाचे पोते मिळत असत. ते आम्ही शेगडी आणि चुलीसाठी वापरत असू. गोष्टी बर्यापैकी सुरळीत चालल्या होत्या.
अचानक एके काळी कोळसा मिळणं बंद झालं. (Coal Mines Nationalisation Act 1973 मुळे भारतातील कोळसा उद्योग मोठ्या प्रमाणावर सरकारकडे गेला. या बदलामुळे काही काळ: वितरण व्यवस्था बदलली, खाजगी खाणी बंद/पुनर्रचना, वाहतूक आणि पुरवठा विस्कळीत. म्हणून अनेक शहरांत कोळसा मिळण्यात अडचणी आल्या. घरगुती वापरावर त्याचा परिणाम झाला.)
LPG बाजारात आला होता, पण माझ्या वडलांना त्याच्या सुरक्षिततेबद्दल खात्री नव्हती, म्हणून त्यांनी तो आणला नाही.
आता आमचं घर पूर्णपणे रॉकेलवर चालू लागलं. सुरुवातीला ते इथून तिथून मिळत होतं. पण मग १९७१ च्या डिसेंबरमध्ये मोठं युद्ध झालं आणि १९७३ ला आला तो oil price shock.
त्या काळातली घबराट अमेरिकेत कशी होती हे John Updike यांनी Rabbit Is Rich (1981) मध्ये एका वाक्यात पकडलं आहे —
“The fucking world is running out of gas.”
ह्या सगळ्याचा परिपाक असा झाला की रॉकेल बाजारातून हळूहळू अदृश्य व्हायला लागलं. कधी इथे मिळे, कधी तिथे. कुठे मिळतंय यावर सतत लक्ष ठेवावं लागे. बहुतेक १९७३ च्या उन्हाळ्यात परिस्थिती चांगलीच चिघळली. रॉकेल अनेकदा मिळेनासं झालं.
माझ्या स्पष्टवक्त्या वडलांनी एके दिवशी मला (वय १२) आणि माझ्या भावाला (वय १०) सांगितलं —
“आज जर तुम्ही रॉकेल आणलं नाही तर उद्या घरात स्वयंपाक होणार नाही!”
त्या वेळी माझी आई बहुतेक मिरजेत नव्हती; परीक्षेसाठी पुण्याला गेली होती.
आम्ही अंघोळ करून डबे घेऊन घराबाहेर पडलो आणि मिरजभर फिरायला सुरुवात केली. आमच्यासारखे अजून बरेच लोक रॉकेलच्या शोधात फिरत होते. त्या वर्षी आमची परीक्षा संपली होती — मी आठवीत, भाऊ सहावीत.
उन्हाळ्याची ती सकाळ अजूनही डोळ्यासमोर उभी राहते. टारचे रस्ते, कडक ऊन, आणि हातात रिकामे डबे.
मिरजभर फिरूनही आम्हाला रॉकेल मिळाले नाही. पुढे काय झाले ते नीट आठवत नाही — कदाचित त्या धक्क्यामुळे माझ्या मेंदूने पुढचे काही दिवस आठवणीतूनच काढून टाकले असावेत. पण दुसऱ्या दिवशी घरात जेवण झाले होते — हे मात्र आठवतं.
माझे आईवडील आम्हाला सांगत असत की त्यांच्या आर्थिक चणचणीच्या १९६० च्या आसपासच्या वर्षांत त्यांनी कधी कधी भेळ खाऊन दिवस काढले होते.
त्या सगळ्याच्या तुलनेत माझी परिस्थिती आज खूपच चांगली आहे. आज दुसरा गॅस सिलिंडर वापरायला काढला आहे — तो किमान दोन-तीन महिने जाईल. Microwave आहे.
एकूण ठीकच आहे.
जग बदलल्यासारखं दिसतं. पण कधी कधी जाणवतं — परिस्थिती पुन्हा पुन्हा परत येते.
नीचैर्गच्छत्युपरि च दशा चक्रनेमिक्रमेण।

No comments:
Post a Comment