बा सी मर्ढेकर:
"राव, सांगतां देव कुणाला,
शहाजोग जो शहामृगासम;
बोंबील तळलों सुके उन्हांत,
आणि होतसे हड्डी नरम.
छान शेकतें जगणें येथें
जगणारांच्या हें अंगाला;
निदान ढेकर करपट आणूं
द्या तुमच्या त्या शहामृगाला !"
(#४३, कांही कविता, १९५९/१९७७)
मर्ढेकर तुलना करतायत देवाची शहामृगाबरोबर...तो तसाच शहाजोग आहे म्हणून... शहाजोग म्हणजे नेमके काय?
पण मर्ढेकरांचा सूर थट्टेचा आहे कारण शहामृगाची प्रतिमा (चुकीची) वाळूत डोकं खुपसून बसणारा अशी आहे ... तुम्ही देवाकडे जाल त्यावेळी तो बसला असेल वाळूत डोकं खुपसून...काय उपयोग त्याच्या भरवशाचा, शहाजोगतेचा (अलीकडे शहाजोग शब्द आव आणणारा असा उपरोधात्मक वापरला जातो आणि मर्ढेकर त्यादुहेरीपणाचा उपयोग करतायत)
बेकेट सांगतायत आपल्याला माहित नाही शहामृग काय पहात. बेकेटांचा सूर, थट्टा करण्याऐवजी, मर्ढेकरांच्या 'शहाजोग देवाला' समजून घेण्याच्या वाटतो.
पण एक गोष्ट अलीकडे माझ्या लक्षात आली - मर्ढेकर देव आणि शहामृग पुल्लिंगी वापरतायत...पण शहामृगीचे आयुष्य मात्र वेगळेच आहे... तिला नाही वेळ - ना वाळूत डोकं खुपसून बसायला, ना ढेकर द्यायला...बसलीय उन्हात हड्डी नरम करत!