courtesy: current copyright holders of the late G A Kulkarni's work,'Vangmay Shobha' and Bookganga.com
ही कथा वाङ्मय शोभेच्या दिवाळी १९५९च्या अंकात आली आहे. जीएंची ही कथा बहुदा संग्रहित नाही म्हणून मी ती पोस्ट टाकली.
ह्या चित्राच्या चित्रकाराचा उल्लेख चित्रात नाही. म्हणून राजीव विश्वनाथ डोळेंनी चित्रकाराच्या अनुषंगाने काही चर्चा त्या पोस्टबद्दल केली आणि माझी उत्सुकता चाळवली गेली. मी पुन्हा शोभेच्या त्या अंकाकडे गेलो.
वाङ्मय शोभेच्या दिवाळी १९५९च्या अनुक्रमणिकेचे वरील पान पहा. जी. एंचा उल्लेखच नाहीय, चांगली सहा पानी ( पृष्ठ ४२ - ४८) कथा असूनसुद्धा!
काय कारण असावं? कथा अनुवादीत आहे. तस कथेच्या शेवटी लिहलच आहे. त्यांचा कॉपीराईट एक्सपायर झाला नाहीय म्हणून मूळ लेखकाचा उल्लेख टाळलाय का?
पूर्वी सुद्धा मी जी. एंचच आणखी एक असल उदाहरण दिल होत. ती पोस्ट इथे वाचा 'जी. एंचा पहिला यात्रिक अनुल्लेखित दुसर्याचा...Henry van Dyke's 'The Story of the Other Wise Man', 1895'.
त्यावेळी (ऑक्टोबर १९६०, म्हणजे एका वर्षानंतर) जी. एंचा उल्लेख अनुक्रमणिकेत तर होताच, शिवाय संपादकांनी त्याकथेबद्दल कौतुकाने त्यांच्या सदरात लिहले होते. पण तिथे सुद्धा मूळ लेखकाचा उल्लेख नव्हताच. मी तो लेखक शोधून काढला होता.
जी. एंच्या पत्रांच्या पहिल्या दोन खंडात तरी या कशाचाही उल्लेख मला आठवत नाहीय.
मी मराठी लेखक / प्रकाशकाच्या अडचणी समजू शकतो तरी मूळ लेखकाचा उल्लेख न करण ही खेदजनक बाब आहे, लेखकावर अन्याय करणारी आहे.
ह्याच काळात, 'शोभा'त, सदानंद रेग्यांच्या किमान दोन कथा/कादंबऱ्या, अनुवादीत आणि मूळ लेखकाचा उल्लेख असलेल्या, प्रकाशित झालेल्या मी पहिल्यात. त्या अनुवादांबद्दल मी या ब्लॉग वर लिहायचा प्रयत्न करणार आहे.
ऑगस्ट १९४७च्या 'शोभा'च्या अंकात जीएंची 'आयुष्यातील एक पान' नावाची कथा आहे. ती अँटन चेकॉव्ह (१८६०-१९०४) यांच्या 'A Day in the Country', में १८८६ या कथेचा अनुवाद आहे. त्या कथेच्या शेवटी लिहले आहे : 'चेकॉव्ह वरून', कथेच नाव नाही.
सध्याच्या (आणि बहुतेक त्याआधीच्या सुद्धा) भारतीय कॉपीराईट कायद्याप्रमाणे ती ही कथा त्यावेळी public domain मध्ये नव्हती. चेकॉव्ह वारले त्याल्या फक्त ४३वर्षे झाली होती! तरी चेकॉव्ह यांचा नामोल्लेख आहे मग इतरांचा का नाही?
फेसबुक एक कमेंट आली :
" नारिंगी रूमालच्या खालीसुद्धा मूळ लेखकाचं नाव नाही आहे, फक्त अनुवाद केल्याचा उल्लेख आहे. आयुष्यातील एक पान मात्र चेकाॅव्हच्या कथेचा अनुवाद असल्याचा उल्लेख आहे. या सगळ्या कथा सोनपावले मधे असण्याची शक्यता आहे. चांदण्याची सावली, आयुष्यातील एक पान या तरी सोनपावले मधे आहेत अशी नोंद जीएंची निवडक पत्रे खंड २ मध्ये आहे. मग चेकाॅव्हच्याच असतील का कथा? अजून एक आठवतंय की जीएंनी कुणाला लिहिलं होतं ते पत्र आता आठवत नाही बहुतेक विजय पडळकरांना लिहिलेलं असेल, त्यात एका इंग्लिश कवितेचा अनुवाद लिहिला आहे. कविता आहे My Father , पण तिथे जीएंनी म्हण्टलंय की त्यांना ती कविता कोणी लिहिली आहे, कोणत्या मासिकात आली होती, कधी छापून आली होती हे काहीच आठवत नाही फक्त ती कविता आठवते, तिचा आशय आठवतो, त्यावरून तिचा भावानुवाद त्यानी लिहिला. तसंच या कथांचं असेल का? म्हणजे कुठेतरी कुठल्यातरी मासिकात, वर्तनमानपत्रात वगैरे छापून आलेली कथा आठवत असेल मात्र तिचा लेखक, कथेचा काळ वगैरे काहीच आठवत नसेल म्हणून फक्त इंग्लिशवरून अनुवादित असंही असू शकेल ना!"
त्यावर माझी प्रतिक्रिया :
" मानवी व्यवहारात सगळ शक्य आहे. पण जीए लेखनाच्या बाबतीत खूप शिस्तीचे, organized होते असे मला कायम वाटत आले आहे.
कवितेच्या बाबतीत अर्थातच ते सहज शक्य आहे - म्हणजे कविता आठवण आणि कवी न आठवण... सहापानी कथा केवळ आठवणीतून लिहणे अशक्य नाही पण मग लेखक पण बहुदा आठवला पाहिजे...आणि मग पहिल्या 'यांत्रिक'च काय? हेन्री व्हॅन डाईक पण नाही आठवले?
तुम्ही शब्द वापरलाय: भावानुवाद... जी. ए शब्द काटेकोरपणे वापरतात. ज्यावेळी ते अनुवाद म्हणतात त्यावेळीं तो अनुवाद आहे भावानुवाद नाही. एक उदाहरण देतो. 'आयुष्यातील एक पान' ह्याची तुलना मूळ कथेबरोबर करून पहा. तो अनुवाद आहे हे लगेच लक्षात येते. दुसर, जी ए लेखकांना इतका मान देतात की ते मूळ कलाकृतीबरोबर छेडछाड करणारच नाहीत.
लेखक आठवत नसता तर अस लिहिता आल असत : "वाचकहो ही कथा मला आठवते पण दुर्दैवाने मला मूळ लेखक आठवत नाहीय. त्याबद्दल क्षमस्व." चेकॉव्ह लेखक आठवतात म्हणजे त्यांची कोणती कथा शोधण अवघड त्यावेळीही नव्हत... त्यांच्या कथांची दोन-तीन पुस्तके असायची, आज एक व्हॉल्युम मध्ये सर्व चेकॉव्ह असतात.
आणि सगळ्यात कमाल म्हणजे जी. ए अनुक्रमणिकेतून गायब आहेत! १९५९साली मराठी वाचकांना त्यांचे नाव सुपरिचित झाले होते... दिवाळी अंकात त्यांची कथा असून श्रेयनामावलीत उल्लेख नाही? हा सगळा खूपच योगायोग असला पाहिजे.... "