बा सी मर्ढेकर:
"कणा मोडला निश्चलतेचा
ह्या पालीच्या आवाजाने;
'धम्मं सरणम्' कुणी बोललें
पाषाणांतिल बुद्ध-मिशानें,
सरणावरती सरण लागलें,
जिवंत आशा पडे उताणी;
गया गोपीचा उतरे राजा.
'सुटला', म्हणती सारे, 'प्राणी' !"
(कविता क्रमांक: ३७, 'कांही कविता', १९५९/१९७७)
१९७०च्या दशकात शालेय नभोवाणी या रेडिओ वरील कार्यक्रमात श्री पु भागवतांचे मर्ढेकरांवरचे छोटे भाषण ऐकले. त्यात श्री पुंनी या कवितेचा 'संज्ञा प्रवाहाचे' उदाहरण म्हणून सांगितल्याचे आठवते. श्री पुंनी इतर काही इंटरेस्टिंग गोष्टी सुद्धा सांगितल्या होत्या.... वृत्त बदल, "चंद्रकिरणांनो, तुम्हां ...." (#२०, 'शिशिरागम') ह्या कविते नंतर मर्ढेकरांना कसा नवा सूर, व्यक्तीमत्व सापडले वगैरे....
वरची कविता मला फार आवडली कारण ती लहान होती, म वा धोंड नाव माहिती व्हायच्या आधीच एखादे कोडे सुटावे तशी सुटली होती... त्यातल्या शाब्दिक कोट्या, संज्ञा प्रवाह समजले होते (अस किमान वाटत तरी होत!)... तोंडपाठ झाली होती / अजून आहे....
मिरजेच्या आमच्या रस्त्यावरील दोन मजली कौलारू घरात केंव्हातरी प्रचंड शांतता असताना पालीचा चुकचुकण्याचा खणखणीत आवाज यायचा... त्यामुळे "कणा मोडला निश्चलतेचा/ ह्या पालीच्या आवाजाने" अगदी भिडल होत ...आणखी एक म्हणजे पालीचा आवाज आला म्हणजे बोललेल (असेल तर!) सत्य आहे...
'धम्मं सरणम्' कस आणि कोण बोलल?... "पाषाणांतिल बुद्ध-मिशानें"....किमान त्याचा आव आणत, तशा हेतून...कोणीतरी बोलल
सरण म्हणजे मराठीत : "चिता ; मृत मनुष्यास जाळण्याकरितां केलेली काष्ठादि रचना"....आणि त्या चितेवर "जिवंत आशा पडे उताणी" ...
आणि शेवटी "'सुटला', म्हणती सारे, 'प्राणी' !"
कसली सुसाट कविता हलली....आठ ओळीत, सत्तावीस शब्दात... चुकचुकणारी पाल ते सुटला म्हणत असलेले प्राणी!