कै. मुळगावकरांच्या कलेच्या दर्जाबद्दल मतभिन्नता आहे पण मी मात्र लहानपणापासून त्यांच्या चित्रांकडे - कॅलेंडर वरच्या, जाहिरातीतल्या, मुखपृष्ठा वरच्या- आकर्षित झालो आहे. बाबूराव अर्नाळकरांची मी जास्त पुस्तके वाचली नाहीयेत पण मुळगावकर-कृत त्यांची मुखपृष्ठे मात्र कायम लक्षात राहिली आहेत.
मुळगावकरांनी वाङ्मय-शोभा मासिकासाठी एकाहून एक आकर्षक चित्रे काढली आहेत. कै. दीनानाथ दलाल आणि त्यांची एकप्रकारे जणू स्पर्धाच वाङ्मय-शोभेच्या मुखपृष्ठ-आखाड्यात चालू होती!
वरील जाहिरात वाङ्मय-शोभेच्या नोव्हेंबर १९५१च्या मलपृष्ठावर आहे.
अभिनेत्री उषा किरण (१९२९-२०००) ह्या त्या काळाला अनुरूप अशा सुद्रुढ सुंदर होत्या, आत्तासारख्या अनोरेक्सिक सुंदर नव्हत्या.
त्यावर आधारित मासिकाचे मुखपृष्ठ मुळगावकरांनी किती सुंदर बनवले ते खाली पहा. (मुळगावकर यांची नाममुद्रा या चित्राच्या खाली कोठेही दिसत नाहीये पण मी तो अंदाज बांधला आहे वाङ्मय-शोभेची त्यावर्षातील त्यांची इतर मुखपृष्ठ चित्रे पाहून. माझी चूक झाली असल्यास मी ह्या चित्राच्या खऱ्या चित्रकाराची माफी मागतो.)
ती मुखपृष्ठ तारका उषा किरण यांच्या सारखी हुबेहूब दिसत नसेल पण कोण करेल तक्रार तीचे शालीन पण उठावदार सौन्दर्य बघून?
courtesy: copyright owners of the late Raghuvir Mulgaonkar's (or the artist's) work and Vangmay Shobha
आता त्याच वर्षाचे एप्रिल मधील मुखपृष्ठ पहा...हे ही (मला ओळखू येत नसलेल्या) तारकेवरच आधारित आहे... यावर सुद्धा मुळगावकर यांची नाममुद्रा या चित्राच्या खाली कोठेही दिसत नाहीये पण ते बहुदा त्यांचेच आहे.
courtesy: copyright owners of the late Raghuvir Mulgaonkar's (or the artist's) work and Vangmay Shobha