लोकसत्ताने कै. विश्राम बेडेकरांच्या ‘टिळक आणि आगरकर’, १९८० या नाटकाचे परीक्षण ऑगस्ट ६ २०१७च्या अंकात केले आहे. मी ते नाटक वाचलेले/ पाहिलेले नाही.
त्या परिक्षणातील एक, दोन वाक्य पहा:
"... आगरकरांना त्यांच्या शेवटच्या आजारात टिळकांना भेटण्याची तीव्र इच्छा होती. परंतु ती अधुरी राहिली... शेवटच्या आजारात त्यांना टिळकांच्या भेटीची लागलेली आस प्रेक्षकांचे डोळे पाणावते...."
"... हे सारं जरी असलं तरी या दोघांच्या कुटुंबांत निरपवाद सख्य होतं. टिळकांच्या पत्नी सत्यभामा आणि आगरकरांच्या पत्नी यशोदा यांचा परस्परांबद्दलचा जिव्हाळा कधीच आटला नाही..आणि दुसरीकडे त्यांच्या कुटुंबांमधील अकृत्रिम स्नेह, जिव्हाळा,..."
सर्वसाधारण- १८५८ पासून त्यांच्या निधनापर्यंत, २००८- १५० वर्षे, महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दलचा अंतिम शब्द, माझ्या दृष्टीने, कै य दि फडकेंचा असतो.
फडकेंचे 'आगरकर' १९९६ साली प्रसिद्ध झाले. माझ्याकडे २००२सालची आवृत्ती आहे. हे पुस्तक म्हणजे य दिंच्या तत्कालीन महाराष्ट्राच्या अभ्यासाचे शिखर आहे. 'शोध बाळ गोपाळांचा' आणि 'व्यक्ती आणि विचार' ही यदिंची नावाजलेली आधीची पुस्तके या पुस्तकाची जणू तयारी होती!
'आगरकर' मध्ये बेडेकरांच्या नाटकाचा कुठेही उल्लेख नाही. फडकेंनी त्या नाटकाबद्दल कुठे लिहले आहे का याची मला माहिती नाही.
त्या पुस्तकातील पृष्ठ २५१ आणि २५२ पानांवरील काही मजकुराची छबी खाली पहा:
या वेच्यांवरून मला अस वाटतय की टिळक आगरकरांना त्यांच्या मृत्यूच्या आदल्या दिवशी, १६ जून १८९५ ला संध्याकाळीच भेटले होते आणि आगरकरांना ते आले यामुळे प्रचंड मनस्ताप झाला! आगरकरांचे मृत्यूच्या फक्त काही तास आधीचे वरील कडवट शब्द पहा: "...हे इथून केंव्हा एकदाचे जातात अस मला होऊन गेलं होतं..."
कुठून काढली बेडेकरांनी आणि लोकसत्ताने "भेटण्याची तीव्र इच्छा होती", "आस"....?....मला टिळक-आगरकर कॊटुंबिक जिव्हाळ्याबद्दल सुद्धा म्हणावे असे पुस्तकात काही आढळल नाहीय.
'एक झाड : दोन पक्षी', १९८४ या त्यांच्या साहित्य ऍकेडेमी पुरस्कृत पुस्तकामध्ये बेडेकर मैत्री या विषयावर खूप लिहतात. त्यांच्या खाजगी जीवनात मैत्री हा एक जिव्हाळ्याचा विषय होता असे वाचून वाटते. त्या सगळ्याचे projection बेडेकरांनी 'टिळक आणि आगरकर' या नाटकात त्या दोन थोर पुरुषांच्या संबंधांवर केले आहे अस मला कायम वाटत आल आहे.
प्रसिद्ध ऐतिहासिक कादंबरीकार हिलरी मॅन्टेल (Hilary Mantel) यांचे अलिकडचे एक वक्तव्य आठवते :
किंबहुना तो बऱ्याच ठिकाणी इतिहासाचा विपर्यास आहे. ज्या आगरकरांनी 'हॅम्लेट'चे बरे-वाईट मराठीत रूपांतर केले त्यांना बेडेकरांचे नाटक कसे वाटले असते कुणास ठाऊक पण ते शेक्सपियरच्या सर्व नाटकांप्रमाणे काल्पनिक आहे, ऐतिहासिक नाही हे म्हणायला ते नक्कीच विसरले नसते.
[हे मुखपृष्ठ इतके सुंदर आहे की लेखक सुद्धा त्याचे प्रस्तावनेत कौतुक करतात. मला वाटते, आगरकरांचा स्पार्टन साधेपणा (साधे, सोपे डिसाईन) , बुद्धिप्रामण्यवाद आणि त्यातून आलेला ताठरपणा, विचारांची मर्यादा (चौकट) , भाषेची जहालता (कम्युनिस्ट लाल रंग) यातून व्यक्त होतात.]
पोस्ट प्रसिद्ध झाल्यानंतर :
फेसबुक वर हे शेअर केल्यानंतर (पहा: https://www.facebook.com/yadiphadkeaguide/posts/1589091707789661) काही फीडबॅक आला. तो प्रत्यक्षात तिथे वाचू शकता.
मला फक्त एकच म्हणायचय: श्री. फडके वारल्यानंतर या विषयावरची कोणतीही नवी माहिती प्रकाशात आलेली नाही. एक साक्षेपी , कोणताही रंग न लावलेले इतिहासकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या फडकेंनी, उपलब्ध माहितीवरती आणि सखोल अभ्यासानंतर, त्यांच्या पुस्तकात काढलेले निष्कर्ष, मला वाचक म्हणून पूर्ण मान्य आहेत. मला त्याबाबतीत कोणताही संदेह नाही.