आज जुलै २९ २०२०, शि द फडणीस ९५ वर्षांचे होत आहेत.
गोविंदराव टेंबे :
"... आणि सर्व मैफल गुलाबपाण्याचा फवारा तोंडावर मारल्याप्रमाणे पुन्हा ताजीतवानी , तरतरीत झाली;..."
('माझा संगीत व्यासंग')
आजवर अनेक वेळा त्यांच्यावर ह्या ब्लॉगवर पोस्ट झाल्या , अनेक वेळा उल्लेख झाले.
त्यांचे घनिष्ट मित्र, त्यांच्या सारखेच कोल्हापूरकर, कै वसंत सरवटे त्यांच्या मित्राबद्दल म्हणतात :
"... जरुर
तेवढाच तपशील, चित्रातून म्हणायच आहे ते पाहिल्या बरोबर, बिनचूकपणे
पाहणार्याच्या ध्यानात येईल अशी चित्रातील मांडणी आणि डोळ्यास आल्हाद देईल
अशी रंगरचना... रंग हे फङणीसांच्या चित्रांच एक महत्वाचं अंग आहे हे त्यांची 'मोहिनी'वरील
चित्रं पाहणार्याच्या सहज लक्षात येईल. आल्हाददायक रंगसंगती त्यांच्या
चित्रांना स्वप्नमय, तरल स्वरुप देण्यास फार मोठी मदत करतात..."
मी काय चोमडे बोलणार या पुढे!
लहानपणी आजूबाजूला जे जे सुंदर, हवेसे वाटत असे ते सगळे शि दंच्या चित्रासारखे वाटत असे. उदा: माझी आई खप सुंदर होती , ती शिदंच्या चित्रनायिकेसारखी भासे! हळूहळू समजत गेले की हे जग अतिशय दुःख, वेदना, हिंसा, हाव आणि पापांनी भरले आहे पण तरी शिदंच्या चित्रांनी तयार केलेली आशा कधी सुटली नाही , अगदी कोरोनाच्या काळात सुद्धा.
ऑडेन (W H Auden) यांची प्रसिद्ध कविता आहे:
“…though one cannot always
Remember exactly why one has been happy,
There is no forgetting that one was” (Good-Bye to the Mezzogiorno )
मला मात्र आठवते कधी कधी मी का आनंदी असायचो.... एक कारण म्हणजे, मी नुकतेच शिदंचे चित्र पहिले होते आणि गुलाबपाण्याचा फवारा माझ्या तोंडावर कोणीतरी मारल्याप्रमाणे मला वाटत होते !
1954, कृतज्ञता: शि द फडणीस यांच्या कलाकार्याचे कॉपीराईट होल्डर्स
No comments:
Post a Comment