मिरजेत आम्ही एकाच घरात १९६१ ते १९८५ पर्यंत राहिलेलो असल्याने, आम्हाला तो परिसर 'पाठ' झाला होता, बदल होत असत पण फार मोठे नाही, आम्ही गेल्या नंतर तिथे बरेच बदल झाले आहेत पण तरी त्या भागाची रूपरेषा अजून जवळपास तशीच आहे...
माणसे मात्र बदलत गेली, बिऱ्हाडे बदलली, काही जण वारले, मुले मोठी होत होती ....
आमचे घर आज (२०१९) पाडून पुन्हा बांधले गेले आहे पण मी शेवटचे पाहिले (२०१९) त्यावेळी समोरचा जोशी वकीलांचा वाडा किंचितही बदलेला नव्हता, जीर्ण झाला होता, त्या वाड्यात त्यावेळी कोणीही रहात नव्हते (आम्ही असताना तीन ते चार संसार आणि काही वर्षे मिरजेला शिकायला आलेले जवळच्या गावातून आलेले विद्यार्थी तिथे रहात असत)....
दरवाजा उघडून आत गेल्यावर समोरच्या बाजूला एकामागे एक अशा तीन खोल्या होत्या, त्यात पहिल्यांदा डॉक्टर हं प्रा पटवर्धन रहात व प्रॅक्टिस करत असत (आम्ही दुसऱ्यांदा देवीची लस तिथेच टोचून घेतली होती), अगदी वरच्या मजल्यावर माझ्या वडलांनी एखादा वर्ष (१९६९ च्या आधी) इंग्लिश चे क्लास सुद्धा घेतले होते... नंतर डॉक्टरांच्या जागी शाराक्का जोशी , त्यांचे पती (गुरुनाथ बिष्टो) आणि त्यांची तीन मुले रहायला आले....
शाराक्का जोशी यांचे कुटुंब कानडी भाषिक होते... त्या आईपेक्षा पुष्कळ मोठ्या होत्या, त्यांची मुले आमच्या पेक्षा मोठी होती... त्यांच्या कुटुंबामुळे आम्हाला थोडे कानडी समजू लागले... त्यांच्या कडे पैशाची चणचण असे (त्यावेळी ती बहुतेकांना असे)... आई जमेल तेंव्हा पैसे पुढे करत असे... डोसे, इडली, पोहे असे अनेक पदार्थ त्या आम्हाला मधूनच करून खायला घालत असत... आम्ही भावंडे आणि आई, शाराक्काना घेवून, त्यांच्या विवाहित मुलीकडे अलमट्टीला १९७४ च्या उन्हाळ्यात गेलो होतो...माझ्या लग्नात १९८७ साली त्यांची आणि आमची शेवटची भेट झाली असावी...
त्यानंतर त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे काय झाले (दरम्यान त्यांचे पती वारले, शाराक्का त्यांच्या दिवंगत पहिल्या पत्नीची धाकटी बहीण होती) या बद्दल आम्हाला खूप कमी माहिती आहे...
WA चा आणि फोन चा फायदा तेवढ्या बाबतीत तरी आता खूप आहे, तुम्ही फार एकमेकात गुंतले जरी नसला तरी तुम्ही संपर्कात राहू शकता ...