सदाशिव आत्माराम जोगळेकर (स आ) (१८९७-१९६३) , वाङ्मयशोभा मासिक , दिवाळी अंक १९५९, भानू शिरधनकरांना दिलेली मुलाखत :
".... सह्याद्रीची मुख्य रांग तापीतीरापासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेली आहे. त्याची रांग सुमारें ११०० मैल लांब आहे. तापीपासून पालघाटपर्यंत सह्याद्रीची रांग सलग असून तिची लांबी ८०० मैल आहे. पालघाटनजीक ही रांग मधेच तुटून तेथें सुमारें वीस मैलांचं मोठालं खिंडार पडलेलं आहे व त्याच्या दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत ३०० मैलांची सह्याद्रीची दक्षिणश्रेणी पसरलेली आहे. सह्याद्रीचे दक्षिणेकडील शेवटचं शिखर म्हणजे महेंद्रपर्वत होय. महाराष्ट्रांतील सह्याद्रीची उंची सरासरी ३००० फुटांइतकी आहे. नाशिकजवळचं कळसूबाई हें सह्याद्रीचं अत्युच्च शिखर. या शिखरावर प्रथमारोहण आर्चडीकन गेल (Archdeacon Gale) यानं १८६० साली केलं. सकाळचे वेळीं या शिखरावर चढून त्यानं भोवताली नजर टाकली तेव्हां त्याच्या तोंडून उद्गार निघाले की, "खरोखर हा दक्षिणेतील पर्वतांचा राजा आहे!" कळसूबाईची उंची ५४२७ फूट आहे. मलबारजवळ सह्याद्रि व निलगिरी यांची भेट होते तेथें सह्याद्रीच्या शिखरांची उंची सात-आठ हजार फूट सहज आहे.' 'सातपुडा, सातमाळ, बालाघाट व महादेव या सह्याद्रीच्या महाराष्ट्रातील शाखा असून देशावर व कोकणांत याच्या अनेक लहान-मोठ्या रांगा सर्वत्र पसरलेल्या आहेत. येथील हवामान, पाऊस व पाणी हीं सर्व सह्याद्रीवरच अवलंबून आहेत. सह्याद्रीवरील पर्जन्यवृष्टीमुळे येथील नद्या दुथडी भरून वाहतात!'
मी मधेच त्यांना म्हटलं, 'सह्याद्रीच्या या सर्व शाखा-उपशाखा, डोंगररांगा, दऱ्याखोऱ्या यांची, कोटकिल्ल्यांची माहिती गोळा करण्यासाठीं व त्याची इतर पर्वतश्रेणींशी तुलना करतां यावी म्हणून आपणांस सह्याद्रीत खूपच पायपीट करावी लागली असेल नाहीं?'
'होय' ते म्हणाले, 'पण अगोदर मला हे सांगायला हवं की सह्याद्रीशी तुलना करण्यासारखा जर कोणता पर्वत असेल तर तो एक हिमालय होय. अरवली नि निलगिरी त्याचे मानाने कितीतरी लहान. सातपुडा तर त्याचाच एक भाग. विंध्य हा अर्वाचीन पर्वत नाही, कारण तो मध्यभारताच्या पठाराचा किनारा मात्र आहे. नर्मदेच्या तीरानजीक त्याची उभारणी तटबंदीसारखीच दिसते म्हणून त्याला पर्वत म्हणायचं. सह्याद्रीची तुलना करायची तर ती हिमालयाशीच करता येईल. हिमालयाचं सौंदर्य जगांत अद्वितीय आहे. हिमाच्छादित पृष्ठभाग, उत्तुंग शिखरं, निर्मळ सरोवरं, हिरवीगार वनश्री, स्वच्छ प्रवाह ही हिमालयाची प्रत्येक अंग अवर्णनीय सौंदर्यानं नटलेली आहेत हें खरं! पण सह्याद्रि सौंदर्याचे बाबतीत कांहीं कमी नाहीं. अमरकंटक, कळसूबाई ही उत्तुंग शिखरं, तोरणमाळ व महाबळेश्वर ही प्रशांत पठारें, गोदावरी व कृष्णा यांची मनोहर खोरीं, दूधसागर व जोग येथील प्रचंड धबधबे, आंबोली व आंबेनाळी येथील प्रदीर्घ घाट, जावळी व कारवार येथील घनदाट अरण्यं पाहिली की सृष्टिसौंदर्याबाबत सह्याद्रीहि कांही कमी नाहीं हें सहज पटेल."
सौजन्य ChatGPT

No comments:
Post a Comment