पूर्वी लिहले असेल पण कोल्हापूर माझे स्वप्नातले गाव होते ...त्यात अंबाबाई आणि ताई मावशी सुद्धा होत्या ...
आम्ही मिरजेहून तिथे वर्षातून एकदा तरी काही दिवसांसाठी जात असू ...पण दिवाळीला कधी नाही...पण १९७०च्या दशकात एका त्रिपुरी पौर्णिमेला (कार्तिक पौर्णिमा) आम्ही तिथे होतो ...संध्याकाळचे आठ साडेआठ वाजले असतील...बाहेरच्या खोलीत घातलेल्या गाद्यांवर आम्ही लोळत होतो ....तेवढ्यात काका (ताई मावशीचे पती) घरी पोचले आणि काहीसे त्रासिक सुरात आम्हाला म्हणाले देवळात जाऊन दीपमाळ बघून या ...
अंबाबाईचे देऊळ मावशीच्या घरापासून हाकेच्या अंतरावर होते (घाटी दरवाजा उर्फ उत्तरद्वार) ...आम्ही देवळात नेहमीच , खूप वेळासाठी जात असू, खेळत असू , ते इतके सुंदर दिसायचे, त्यातील पितळेचा उंबरठा मला फार आवडे, त्याच्या आत सुद्धा कधीकधी जात असू ....शिवाय देवळाचा वापर इकडून तिकडे जायला पण करत असू (आज त्यातले काही करणे सामान्य माणसाला शक्य नाही)....
आम्ही काकांच्या सांगण्यावरून थोडे रडतखडत गेलो आणि त्या उजळलेल्या दीपमाळेमुळे मी काकांना कधी विसरणार नाही , ना त्यांच्या उपकारातून मुक्त होऊ शकेन ....
आता स आ जोगळेकर , वाङ्मय शोभा , दिवाळी १९५९ च्या अंकात भानू शिरधनकर यांना दिलेल्या मुलाखतीत ("स. आ. आणि सह्याद्रि") काय म्हणतात पहा ;
"...सह्याद्रीच्या कडेपठारांत उल्लेखनीय अशीं मंदिरं नाहीतच काय? या ग्रंथांत त्यांचा उल्लेख फारसा आलेला नाही.'
'देवळांचा भाग या ग्रंथांत आला नाहीं हें खरं आहे. जबरदस्त पर्जन्यवृष्टीमुळं सह्याद्रीच्या कडेपठारावर देवळं फारशी उरलेली नाहीत. फक्त चालुक्यकाळातील थोडी देवळं इथं शिल्लक आहेत. पण सह्याद्रीच्या प्रत्येक शिखरासमोर शंकराची मंदिरं आजसुद्धा आपण पहातों. शक्तीचीहि मंदिरं अनेक ठिकाणीं सह्याद्रीच्या उत्तुंग शिखरांसमोर आहेत. सह्याद्रीची हीं शिखरं म्हणजे त्या देवालयांसमोरील दीपमाळच जणू ! दीपमाळ ही फक्त महाराष्ट्रांतील देवालयांसमोर आढळून येते. दक्षिण अगर उत्तर भारतांत ती मुळींच आढळत नाही आणि म्हणूनच दीपमाळ ही सह्याद्रीच्या सुळक्यांची प्रतीक वाटते.'..."

No comments:
Post a Comment
Welcome!
If your comment (In Marathi, Hindi or English) is NOT interesting or NOT relevant or abusive, I will NOT publish it.
Comment may get published but not replied to.
If you are pointing out a mistake in the post and if I agree with your claim, I will change the post and acknowledge your contribution.
Only if you agree to this, post your comment.