Artist: Saul Steinberg
मराठीतील प्रथम ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, पदमभूषण, आणीबाणीचा निषेध न करणाऱ्या वि. स. खांडेकरांवर दुर्गाबाई आणि अनेकांनी तुफान टीका केली असली आणि मला ही त्यांची 'ययाती' सकट अनेक पुस्तके आवडली नसली तरी, त्यांच्या आणि ना सी फडके यांच्या समीक्षेबद्दल मला आदर वाटत आला आहे.
समीक्षा फक्त कलेचीच नाहीच तर कधी समाजाची सुद्धा.
जयवंत दळवींनी (१९२५-१९९४) घेतलेल्या खांडेकरांच्या १९७० सालच्या दोन मुलाखती वाचून तर मला याची खात्री पटली. त्यातील बरेच भाग मला उद्धृत करावेसे वाटतात.
मी मिरजेला रहात असताना (१९६१-१९८१), मिरज विद्यार्थी संघाचे आणि तेथील वसंत व्याख्यान मालेचे सर्वेसर्वा आणि आमचे सर वसंतराव आगाशे व आमचे कौटुंबिक स्नेही पंडितराव खाडिलकर जमेल त्यावेळी कोल्हापूरला जाऊन खांडेकरांचे मार्गदर्शन घेत असत. ते किती मौल्यवान असेल याची मला आज ४०-५० वर्षांनंतर खात्री पटते आहे.
जी ए कुलकर्णी खांडेकरांचे फॅन आहेत असे कधीच वाचनात येत नाही पण ते त्यांचे प्रत्येक पुस्तक खांडेकरांना पाठवत. खांडेकर जीएंना लिहलेल्या एका पत्रात लिहतात - "आज मास्टर विनायक असते तर त्यांनी तुमच्या कथेवर उत्तम चित्रपट काढला असता"... (हे अगदी माझेच शब्द मला वाटतात).... ह्या वाक्यावरून खांडेकरांचे साहित्य आणि सिनेमा ह्या दोन्ही कलांचे ज्ञान आपल्याला कळते.
दळवींच्या मुलाखतीत खांडेकरांनी सखाराम बाइंडरची केलेली समीक्षा आणि १९-२०व्या शतकातील मराठी साहित्याचा जागतिक साहित्यासमोरचा थोटकेपणा याचे खांडेकरांनी केलेले कारणासहित विश्लेषण वाचण्यासारखे आहे आणि मला ते पटले.
दळवींनी त्यांना साहित्यिक सध्या (आणि ते २०२३ साली जास्त लागू आहे) इतकी सगळ्या विषयांवर भाषणे का ठोकत असतात, हे विचारले... पुढचे सोबतच्या फोटोत वाचा...
कृतज्ञता: श्री गिरीश जयवंत दळवी (पृष्ठ ३०-३१, 'साहित्यिक गप्पा: दहा साहित्यिकांशी', जयवंत दळवी, १९८६-२०१३)
No comments:
Post a Comment
Welcome!
If your comment (In Marathi, Hindi or English) is NOT interesting or NOT relevant or abusive, I will NOT publish it.
Comment may get published but not replied to.
If you are pointing out a mistake in the post and if I agree with your claim, I will change the post and acknowledge your contribution.
Only if you agree to this, post your comment.