दुर्गाबाई भागवतांचा 'फुलभेट' हा 'प्रासंगिका' १९७५-२००३ मधील लेख मला नुसता आवडतो नाही तर तो मला अतिशय शृंगारिक वाटतो.
नागकेशराचे (Mesua ferrea) फुल मी काही फार वेळा पहिले नसेल. त्याचा वास सुद्धा मला आठवत नाहीये. त्या फुलावर हा लेख आहे.
त्यात दुर्गाबाई एका साठ वर्षाहून जास्त वय असणाऱ्या बेळगावमधील सौ. तमण्णाचार्य, ज्यांच्या घरी त्यावेळी त्या गेल्या होत्या, यांचे वर्णन थोडक्यात करतात :
"१९३६ चे वर्ष असावे ... तमण्णाचार्यांची पत्नी साठीपलीकडे पोचली असूनही अत्यंत सुंदर होती. केस फक्त पिकले होते. पण त्या रुपेरी केसांची शोभाही अपूर्व होती. रंग सतेज गुलाबी; चेहरा अतिशय रेखीव, बांधा सुडौल, बाई अत्यंत नीटनेटकी. लुगडे चापूनचोपून नेसलेली. दागिन्यांनी मढलेली. केसांत नेहमी गजरा. नाकात चमकी. आपल्या रूपाची जाणीव क्षणभरही न विसरणारी व्यक्ती मला अजून दुसरी दिसलीच नाही..." (पृष्ठ ३३)
मला तर लहानपणचा 'चांदोबा' आणि त्यातील एकाहून एक सौष्ठवपूर्ण स्रीया आठवल्या.
लोक कबूल करोत अथवा नाही, चांदोबाच्या लोकप्रियतेचे ते एक महत्वाचे कारण होते. पुढे महाबली वेताळ आणि अमर चित्र कथांमध्ये सुद्धा हा अँगल होताच.
आणखी एक गोष्ट.
जी. ए. कुलकर्णी: "...मी मॅट्रिकला असताना एकदा शिरसी नावाच्या गावी गेलो होतो. तेथे माझ्या
दुपटीहून थोडी जास्त वयाची स्त्री दिसली होती. ती सुंदर होती असे म्हणणे
understatement होईल. ती देदीप्यमान होती. तिने लग्न मात्र एका काळ्या
सामान्य माणसाशी केले. तो अत्यंत बुद्धिमान होता व विशेष म्हणजे त्याला
sense of humour फार आकर्षक होता. तो कुठेही गेला, तर 'मी रमाचा नवरा' अशी
ओळख करून देत असे व मग मोठ्याने हसून ''असे सांगितल्याने ओळख पटते. रमालाच
ओळखणारे लोक जास्त!" हा प्रेमविवाह होता आणि तो विवाह दोघांनाही अतिशय
सुखाचा झाला याचे लोकांना आश्चर्य वाटे... रमा नवऱ्याआधी वारली. नंतर
त्याचे जीवन हबकल्यासारखेच झाले. त्याने नोकरी सोडली. थोडा पैसा होता
खरा, पण तोही त्याने वापरला नाही. बंगळूरला त्याच्या भावाचा कसला तरी छोटा
कारखाना होता. तेथे तो दिवसभर बसून असे म्हणे. आज रमा नाही, की
विष्णुदास (हे त्याचे नाव) नाही. पण इतक्या वर्षानंतर ती आठवण झाली, की
मोसमाबाहेर जाईची वेल उमलल्यासारखी वाटते. 'रमा' हे नाव आकर्षक नसावेच, पण
त्याबद्दलची ही आठवण मात्र ओलसर सुगंधी आहे... "
(पृष्ठ १८९-१९०, 'जी एं. ची निवडक पत्रे', खंड १, १९९५)
मराठीतील दोन आघाडीचे आणि महत्वाचे लेखक (एक स्त्री आणि एक पुरुष) दोन भिन्न कर्नाटकातील स्त्रियांचे कसे उत्कट पणे वर्णन करतात हे पाहण्यासारखे आहे!
No comments:
Post a Comment
Welcome!
If your comment (In Marathi, Hindi or English) is NOT interesting or NOT relevant or abusive, I will NOT publish it.
Comment may get published but not replied to.
If you are pointing out a mistake in the post and if I agree with your claim, I will change the post and acknowledge your contribution.
Only if you agree to this, post your comment.