Tuesday, December 01, 2020

जेंव्हा बा सी मर्ढेकरांनी काढले प्रोपागांडा पोस्टर.....Forging The Keys of Fortune

#बासीमर्ढेकर१११
 
"दण् कट दंडस्नायू जैसे 
लोखंडाचे वळले नाग;
कभिन्न काळ्या मांड्या जैसा
पोलादाचा चिरला साग,
...
यंत्रयुगांतिल नवनृत्याचा
स्थाणुभाव हा प्रगटे येथें

मनोज्ञ मुद्रा शिल्पित एक
संगमरवरी मांसामध्यें,
 

 -अहा, कोळसेवाला काळा !
नव्या मनूंतिल गिरिधर-पुतळा !!"


[कविता क्रमांक ४६, पृष्ठ  ५८,  "कांही कविता",  "मर्ढेकरांची कविता", १९५९- १९७७]

 
मला बा सी मर्ढेकरांची "दणूकट दंडस्नायू जैसे..." ही कविता (४६, पृष्ठ: ५८) ऐकायला छान वाटते, ह्या ब्लॉगवर ती पूर्वी आली सुद्धा आहे पण ह्या कवितेचा वास्तवाशी फारसा संबंध नाही हे फार वर्षांपासून जाणवायच कारण मी स्वतः लोहारकाम (ज्यात कोळसा झोकणे आले) कित्येक वर्षे मिरजेला जवळून पहिले आहे... ते काम करणारी लोक (त्यात एक तरी स्त्री नेहमी असे) मर्ढेकरांच्या गिरिधर-पुतळ्याच्या ग्रहावर पण रहायची नाही अस वाटाव इतकी ती कविता कृत्रिम (पण सुंदर) वाटते.... शिवाय आम्ही कित्येक वर्षे घरात कोळशाची शेगडी आणि चूल वापरत असू. घरी कोळशाचे पोत कायम असे आणि ते द्यायला "कोळसेवाला काळा" येत असे.

दुर्गाबाईंनी "प्रस्थापित व्यवस्थतेचा निषेध" (सत्यकथा होळी वगैरे) करणारी एक बैठक पुण्यात १९६९ साली अटेंड केली... त्यावर आधारित लेख त्यांनी "नवी क्षितिजे" मध्ये लिहला . तो आता "विचारसंचित", सं: मीना वैशंपायन, २०१५ मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.. त्यातील छोटा परिच्छेद... 


 (वरील परिच्छेदा बद्दल दुर्गाबाईंच्या कार्याच्या कॉपीराईट होल्डर्स चे अनेक आभार)

मराठी साहित्यात उपयुक्ततावाद, समाजवाद, बांधिलकी-कंमिटमेन्ट वगैरे, १९३०-४०च्या नाही तर पार आगरकरांच्या (जे एस मिल यांचे अनुकरण करत) वेळेपासून घुसून, प्रतिष्ठित झाले, वाङ्मयीन मूल्यांना वरचढ ठरू लागले, त्याला मर्ढेकर एखादेवेळी बळी कसे पडले त्याचे हे उदाहरण.....

"दणूकट दंडस्नायू जैसे" हि मला चक्क स्टालिनच्या रशियातील party propaganda चे पोस्टर वाटते!

"We are forging the keys of fortune". 1965