Saturday, August 15, 2020

"पिपांत मेले" कविता "मी एक मुंगी" पेक्षा श्रेष्ठ कविता आहे....Two Poems of Mardhekar

मे २१ २०१८ला मी तयार केलेल्या बा सी मर्ढेकरांच्या पेजवर खालील मजकूर टाकला होता:

"परवा लिहल तस मर्ढेकरांच्या मला समजलेल्या किंवा आवडलेल्या कवितांकडे मी स्वतः माझ्या जीवनाच्या सापेक्ष बघायचा प्रयत्न केलाय, जीवन बदलतंय तस आकलन बदलतय...

आता ह्या ओळी पहा:
"... ह्या मुंग्यांतील एकेकीला
बनेल खाउनि राजा कोण...."

".... हा मुंग्यांचा लोंढा आला ! खोला, फाटक खोला !-"
(१६, पृष्ठ ८९, 'मर्ढेकरांची कविता', १९५९/ १९७७)

आपल्याला माहित आहे मर्ढेकरांच्या कवितात उंदीर, मुंग्या म्हणजे माणसेच... पण मी तसा विचार नेहमी केला नाहीय...

लहानपणी जॉर्ज ओरवेल यांची ऍनिमल फार्म (माझ्या वडिलांनी केलेला त्याचा मराठी अनुवाद) ही मी कित्येक वेळा पंचतंत्र किवा इसापनीती सारखी वाचलीय (आणि बॉक्सरच्या मृत्यूनंतर प्रत्येकवेळा थोडा रडलोय).

मुंग्या आणि मुंगळे  हे माझ्या बालजीवनातील अत्यंत महत्वाचे प्राणी होते (त्याशिवाय बेडूक, उंदीर, सरडा, गांडूळ, पाल, कोंबडा-कोंबड्या, म्हैस, गाय-बैल, शेळी, बोकड, गाढव, कुत्री, मांजर, साप  वगैरे). सगळीकडे मुंग्या असत,. विशेषतः उन्हाळ्यात. माझे कित्येक तास त्यांना पाहण्यात गेले आहेत. मुंगळे सगळ्या झाडांच्या पारावर असत - वड, पिंपळ... पेरूचं झाड तर भरलं असायच त्यांनी....त्यांनी घेतलेले चावे अजून आठवतात...
मुंग्या ह्या इतक्या ubiquitous होत्या की त्या माझ्या अत्यंत आवडत्या साखरांब्याच्या (मुरांबा), आईने अत्यंत घट्ट, कापड लावून बंद केलेल्या बाटलीत हमखास पोचत.

म्हणजे शाळेत मी Francesco Redi (https://en.wikipedia.org/wiki/Francesco_Redi He was the first person to challenge the theory of spontaneous generation by demonstrating that maggots come from eggs of flies) यांचा सिद्धांत अभ्यासत होतो पण आमच्या घरी मुंग्या त्या सिद्धांताला मानायला तयार नव्हत्या!

त्यानंतर काही वर्षांतच मर्ढेकरांची 'मुंगी' कविता वाचली , फार आवडली आणि अजून बरीच पाठ आहे .. पण त्यातील एक-दोन गोष्टी नोंद करण्या सारख्या:
"हा मुंग्यांचा लोंढा आला ! खोला, फाटक खोला !".... मुंग्यांसाठी तुम्हाला फाटक खोलायला लागत नाही, त्या फाटक तोडून आत येत असतात!....

दुसरी गोष्ट, वर म्हटल्याप्रमाणे साखरांब्याबरोबरीने काही मुंग्या पोटात गेल्या आहेत... त्यामुळे राजा बनणे तर नशिबी आहेच... अर्थात हे मर्ढेकरांच्या कितीतरी आधी आईने समजावणीच्या सुरात सांगितले होते..."

नंतर आणखी एक गोष्ट लक्षात आली - ऍनिमल फार्म, पंचतंत्र किवा इसापनीती मध्ये लेखकांना कधीही सांगायला लागत नाही की हे प्राणी म्हणजे माणसांचे रूपक आहे म्हणून. मग मर्ढेकरांना हे ९व्या, १०व्या, १३व्या  कडव्यात का ठोकून सांगायला लागतंय? शिवाय कवितेची सुरवात "मी एक मुंगी" अशी आहे. मग पुन्हा पुन्हा "ह्या नच मुंग्या : हींच माणसे :" हे कशाला बजावायला पाहिजे. आम्हाला पहिल्या ओळीतच समजल.

"पिपांत मेले...." (२१, ४१, तत्रैव) मध्ये ते तस सांगत नाहीत.

त्या कारणासाठी, माझ्यासाठी,  "पिपांत मेले" कविता  "मी एक मुंगी" पेक्षा श्रेष्ठ कविता आहे

No comments:

Post a Comment

Welcome!

If your comment (In Marathi, Hindi or English) is NOT interesting or NOT relevant or abusive, I will NOT publish it.

Comment may get published but not replied to.

If you are pointing out a mistake in the post and if I agree with your claim, I will change the post and acknowledge your contribution.

Only if you agree to this, post your comment.