Thursday, January 03, 2019

तातांच्या १० कविता (सुद्धा)....My Father's Poetry

आज जानेवारी ३, २०१९, माझी आई (१०/१०/१९३७ - ३/१/२००६) जाऊन १३ वर्षे झाली. 

माझ्या वडिलांनी (१८ जून १९३६ - ) आयुष्यात प्रचंड लेखन केलं - स्वतंत्र पुस्तके, अनुवाद, अग्रलेख, नाटक, परीक्षणे  वगैरे.... तुम्हाला ते बहुतेक माहित नाहीत कारण ते कोणत्याही साहित्य कंपूत जॉईन झाले नाहीत....

मी त्यांच्या लेखनाचा मोठा फॅन होतो/ आहे.... त्यांनी कविता सुद्धा लिहल्या ... त्यातील १० अजून प्रसिद्ध न झालेल्या कविता खाली देतोय....  

J
  गोकर्णी

जीव खालीवरी
आलो येथवरी
जावू कुठेवरी
भान नाही ।१।
हासडून सारे
नात्याचे दोरे
जाणार कुठे?
नव्हते ठरले।२।
डोळ्यात पाणी
तोलते पापणी
दिवे अंतःकरणी
अंधाराचे ।३।
खांद्यावर वहावे
वेताळांचे थवे
छबिने शिणावे
अनुतापाचे ।४।
पायघड्या रक्ताच्या
माझ्याच जखमांच्या
कळकल्या सुखाच्या
गळाभेटी ।५।
अवकाश विशाळ
खंदले पाताळ
दशदिशा धुंडाळ
कुणासाठी ।६।
सुटलेली साथ
विझलेली वात
हरलेली मात
हातोहात ।७।
बेरंग ठिगळे
देहाचे दिवाळे
कलेवर स्फुंदले
पाठोपाठ ।८।
असणार नाहीस तू पुन्हा
दिसणार नाहीस तू पुन्हा
देणार नाहीस तू पुन्हा
सामक्ष्य सुखाचे ।९।

 ======================================================================

।। सोळा ओळीं मरण ।।
                   गोकर्णी

अशीच येते झुळुक सरसर
स्पर्श अगोचर गार प्रहार ।।
नंतर उरते तीक्ष्ण शिरशिरी
आणिक जातो श्वास वरवरी ।।
अवकाशातील शीत निवारा
थंड अनावर आणि बोचरा ।।
निवूनी विझाव्या उभ्या वासना
गोठाव्या नच अनवट ताना ।।
ज्या थरकापे अवघे जीवन
त्या अंताचे होता दर्शन ।।
उभे ठाकता मरण समोर
तशी गोठावी अथांब शीर ।।
सभोवती भय स्तब्ध धटींगण
कसे टळावे सरण - निमंत्रण ।।
मुक्त भोगण्या मरण आलिंगन
"मरणं शरणं गच्छामि" चे भान ।।

- नाशिक, दि. १३-९-२०१८, गणेश चतुर्थी 
=========================================================================
करुणा सुनीत (सॉनेट)

                   - गोकर्णी

कुणी करुणा केली नाही
कुणी करतही नाही ।।

गर्दीत हरपता हे एकाकी पाय
भर मध्यान्ही जसा हरवला सूर्य ।

बंबाळ पावले तरीही कलथली नव्हती
तीळ तुटले उर, तरी करुणा केली नव्हती

ॐ करुणाकर, दयानिधी , करुणानिधी
हे बिल्ले- बिरुदे हतबल, छद्मी यादी
हे शब्द उगा निर्मिले , कुणास थांगच नाही
हुंदके, गहिवर पुरे, फिरावी करुणा - ग्वाही 

            कर्णावर केली नाही
            कुंती पौत्रांवरही नाही ।
            येशूवर केली नाही
            गांधीवरही नाही ।

कुणी करुणा केली नाही । कुणी करतही नाही ।

- नाशिक, २३-९-२०१८, अनंत चतुर्दशी इस- २०१८

==========================================================================


वाजणारी लाठी
               - गोकर्णी

ये चल । पाऊस ऐकू ये ।

कानाने, डोळ्याने, शरीराने ,
     ये चल, पाऊस ऐकूं ये ।

गडगडाट , धडधडाट , चमचमाट ऐकूं  ये
हिरकणीच्या चुऱ्यापरी झरणारा
धों धों मुसळधार ऐकूं ये । चल ।

x         x           x

शं नो वरुणः शं नो पर्जन्यः, ये
सुखकर शंकर , मनोरम धुमधुम, ऐकूं ये।
थंडी वाजते? ऐकूं न  येते ।
रणरण पडलेले उन्ह ? कधी ऐकू येते?

x         x           x

महाभुते ईशाच्या लाठ्या , ऐकू न येती
आकाश शांत , धरा धीराची , ऐकू न येती
पवन सनन झनन , अचपळ जाणवतो
पर्जन्य पावसाळी धुरंधार ऐकू येतो

धरणीचा जीर्ण विच्छिन्न देह चेतवितो 
चल ये , हे शृंगारपर्व पाहू ये । ये पाऊस
महाभुते कधी दिसती ,
                कधी जाणवती
कधी ऐकू येती
                सारे धरणीचे सांगाती

x         x           x
मुठीत घे ।,
       कुशीत घे ।
            घट्ट मिठीत घे ।

घे सहस्रबाहू ,
           पर्जन्य गर्भात घे ।

ये चल , कवटाळत पर्जन्या भोगू ये ।
ये चल पाऊस ऐकू ये ।।

- २/१०/१८, गांधी जयंती

========================================================================

  कोलंबस
                       गोकर्णी

शतकांपूर्वी सागरतीरी मनुज उभा भन्नाट
सूर्य प्रकाशी नीट पाहतो सिंधू किनारा धीट ।1
असतां वेचित शंख -शिंपले कानी पडला नाद
अनाहूत आवाज ऐकूनि वाचा पुरती बंद ।२
सागरपृष्ठी जेथे नुसत्या खाऱ्या कभिन्न लाटा
पाहूनी तेथे अजब जादुई देवनगरीच्या थाटा ।३
त्या नगरीवर फडकत होते फडफड शुभ्र निशाण
भांबाव जीव गलबला, वाढला अनावर ताण ।।४
ओठ आवळुनी उभाच होता नग्न तिथे वाळूत
कळले नाही केंव्हा गळल्या शिंपा वाळूत ।५
जीभ चावूनी, रेतीवरती रेलुनी काळे गुडघे
गलित लुकलुक, टकमक नजरी भव्य गलबता बघे
     ०           ०          ०
रे मुग्ध मानवा कळले नाही तुला
जिंकुनी सिंधुला कोलंबस हा आला
-----------०----------------०---------------
मूळ लेखन : मिरज १९५८

नाशिक १०/१०/१८

(आंग्लकवी J. C. Squire च्या SONNET वरून)


There Was an Indian by SIR J. C. SQUIRE

There was an Indian, who had known no change,
Who strayed content along a sunlit beach
Gathering shells. He heard a sudden strange
Commingled noise: looked up; and gasped for speech.

For in the bay, where nothing was before,
Moved on the sea, by magic, huge canoes
With bellying cloths on poles, and not one oar,
And fluttering coloured signs and clambering crews.

And he, in fear, this naked man alone,
His fallen hands forgetting all their shells,
His lips gone pale, knelt low behind a stone,
And stared, and saw, and did not understand,
Columbus's doom-burdened caravels
Slant to the shore, and all their seaman land.
 

=======================================================================

                         थोडी थांब
                          -----------
                                                गोकर्णी

पाहता वेल पाहता गंध फुलांनी न्हाली
झरना झाली सरिता सुसाट सुटली ।१
किती वर्षा कोसळल्या तेरवा परवा ,
गेल्या चटवूनि पाणी, हिरव्या झाल्या दुर्वा ।२
पाळण्यात अलवार पाहिलीस स्वप्ने निरंतर 
त्या स्वप्नांना जोजविले मी देता नच अंतर ।३
सात ऋषिंचे तारे वाहती पसरुनिया हात
कृत्तिका पाजती स्तन्य , सुख दुःखावर मात ।४
हास्य तुझे लाघवी खळखळ तरबत्तर
दृष्ट तुझी कढिते, उसळू नको घरभर ।५
घेऊनि शिदोरी भक्कम , टाक पावले पुढे
भेसूर-भयंकर होई सुखकर सरळ वाट सापडे ।६
येतां जातां तुला पाहता वाटे हुरहूर
खरोखरी ग जाशील जेव्हा सोडूनिया दूर ।७
आत्तापासून अनाम घरघर
निश्चित जाशील सोडून हे घर ।८
हुंदका दाटतो , साठते डोळाभर नीर
उंबरा लवंडून , सारशील मज दूर ।९

x          x           x

जाशील कशी तू माझ्यापासून लांब ?
बंदिस्त ठेवले हृदयी , थोडी थांब ।१०

मिरज, १९६०
========================================================================

कोट
     - गोकर्णी

गाण्यांच्या माझ्या शिवला मी अल्पाकाचा कोट
मिथकांच्या कालाबतूंचा मेहरपी सुरेख कोट । १
वेलपत्तींनी पौराणिक होता सजला सुंदर कोट
नखशिखान्त , बन्दगळा , अप-टु-डेट कोट । २
धच्चोट गबाळ्या उल्लूंनी तो चढविला
जणु काही तो त्यांनीच होता बेतला । ३
पैदलशी दाद मिळे , शिट्ट्यांचा नाद चाले
घातला म्हणून, घेतला म्हणून, माझे काय गेले? । ४
जरतारी, रेशमी रुबाबदार माझा कोट
नाही बिघडले , झाले बरे त्यातल्या त्यात । ५
खरा मजा हर्षोल्लास,  आहे गड्या त्यातच,
उघडे- वाघडे , नग्न - नागडे , चालत जाण्यातच । ६

- मिरज १९६०

W. B. Yeats यांच्या 'कोट' वरून


A Coat By William Butler Yeats

I made my song a coat
Covered with embroideries
Out of old mythologies
From heel to throat;
But the fools caught it,
Wore it in the world’s eyes
As though they’d wrought it.
Song, let them take it
For there’s more enterprise
In walking naked.


 
========================================================================

कसा बरे मी ?
                  गोकर्णी
आसपास अनायास तिथे तूं असतांना
नितळ सावळी कोमल काया ललना ।। १
देही दरवळे गंधित प्रकाश -छाया घना
तेंव्हा, तशी तिथे तूं उभी असतांना ।
            कसा बरे मो ? ।। २
०             ०             ०
इकडे, त्यांच्या चर्चा, रुक्ष रंगल्या गजाली बात
      असेल तथ्य त्यातही, ताणल्या शिरा, तावात ।।
      असेलही त्यांचा त्रागा वास्तविक डांगोरा ,
      असेल तो दैनिक वृत्त संथ, रवंथ करणारा ।।
      असेलही रोष तयाचा सामूहिक ठणाणा ,
'मेरा भारत महाग' स्वरच वास्तव गर्जना ।।
०            ०             ०
हे सारे रंजक ऐकतांना
      टाईमपास फक्त गात्रांना
      च् च् च्
त्या नितळ सावल्या शामल सुंदर  
        पुतळीत गढलेला मी
              कसा बरे मी ?
जिवंत सुंदर कायेवर खिळलेले नेत्र हटवूं मी ?
              कसा बरे मी ?

------------------०------------------------
मूळ कविता आंग्लकवी  W. B. Yeats
मिरज , पहिला तर्जुमा, १९६०
१२-१०-२०१८, नाशिक
=========================================================================

ते हि नो दिवसा गताः
              - गोकर्णी
ढासळता भग्न भुईकोटं                     
वरवर कां हळहळ हंत ।१
पाडुनि मला खिंडारे
तुम्ही सजवा ओटे-दारे ।२
खोदुनि मला भगदाडे
दणादणा उभारा वाडे ।३
पाडुनी बुरुज बुलंद
कुणी चढवा इमले धुंद ।४
मम् कबंध नेऊनी माती
मातीच्या बांधा भिंती ।५
नेऊनी अस्थी पाषाण
उठवा पैस घट्ट अंगण ।६
करुनि हा देह विछिन्न
कुणी उठवा वास्तु कभिन्न ।७
पडझडता दिल्ली दरवाजा
कां उगाच गाजावाजा ?  ।८
  

तुम्हीच मला घडविले
तुम्हीच खिळखिळे केले ।९
ही रावांची प्राणप्रिय वास्तु
ही दुर्लक्षित उजाड परंतु ।१०
कां दोष देवूं "कर्माला"
नेवू दे ज्याला त्याला ।११
रावांनी भोगले सर्वांगी जीवन
त्या रावांची याद ही झांली क्षीण ।१२

- करमाळा , मे १९६९

* छत्रपती शिवाजी महाराजांचे जामात बजाजी निंबाळकर यांच्या घराण्यातले रावरंभा निंबाळकर निजामाच्या दरबारी मोठे मनसबदार होते. त्यांच्या जहागिरीची राजधानी करमाळा (जि. सोलापूर) होती.

असाच मिरजेचा भुईकोट किल्ला नामशेष झाला. काप गेले, भोके उरली! *

=========================================================================

                                   सारांश
                                   ______
                                          - गोकर्णी
अर्क वसंताचा सारा साठला कुणात ?
            तुझ्या मधुकरात ।१।
मदन अनंगवास गवसतो कशात ?
          तर्रर तुझ्या शरीरात ।२।
रात्रीचा काळोख किर्रर दिसतो कशात ?
           तुझ्या सडक कुंतलात ।३।
पर्वतराजी शिखर भासती कशात ?
           तुझ्या उभार वक्षात ।४।
धरतीचे आर्त सर्व जागते कुणात ?
       तुझ्या अनावर हुंदक्यात ।५।
ओढ, प्रेम , ध्यास मोह आढळती कुठे ?
       तुझ्या संयत मधुर वाणीत ।६।


व्रत - सांगता, सुकृत पारणे फिटते कुठे?
    तुझ्या सैल मृदू कवेत ।७।
चांदण कोजागिरीत चिंब व्हावे कसे
      आसूस तव चुंबनात जसे ।८।
अविरत नव प्रेमाचा वाटतो का आधार
    आलिंगनी तुझ्या सारांश समीप नवथर ।९।

वसई , १९५८
पुनर्लेखन  विजयादशमी १८-१०-१८

प्रेरणा Robert Browning यांची Summum Bonum, 1889


All the breath and the bloom of the year in the bag of one bee:
All the wonder and wealth of the mine in the heart of one gem:
In the core of one pearl all the shade and the shine of the sea:
Breath and bloom, shade and shine, wonder, wealth, and--how far above them--
Truth, that's brighter than gem,
Trust, that's purer than pearl,--
Brightest truth, purest trust in the universe--all were for me
In the kiss of one girl


==========================================================================

3 comments:

  1. कविता आवडल्याबद्दल आणि प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. त्यांचे लेखन अनेक वर्षे 'गावकरी'त प्रसिद्ध झाले आणि 'माणूस' मध्ये सुद्धा झाले. तरी पण पुन्हा लिहतो की त्यावेळचे जे वेगवेगळ्या ठिकाणातील कंपू होते त्यात ते कधीही शामील झाले नाहीत. आताही तसे डझनाने कंपू फेसबुकवर सुद्धा आहेत. विकिपीडिया वरचे पेज conflict of interest (मुलाने तयार केले म्हणून) आणि कमी visits (कंपूत नाहीत म्हणून) मुळे काढावे लागले. मराठी साहित्य विश्वातील inbreeding बद्दल विलास सारंगांचा सदानंद रेगेंवरचा लेख जरूर वाचावा. मला यापेक्षा जास्त यावर लिहायच नाही. धन्यवाद.

    ReplyDelete
  2. कविता व पोस्ट, सर्व आवडले. विशेषतः २/९/२०१८ व २९/९/२०१८ तारखांच्या कविता खूप आवडल्या. त्यांनी आणखी गद्य लिखाण केले आहे का? कृपया तेही प्रसिद्ध करावे ही विनंती. विनम्र अभिवादन

    ReplyDelete
  3. Thank you Shri. Wagholikar. As I said on Facebook, माझ्या वडिलांनी आयुष्यात प्रचंड लेखन केलं - स्वतंत्र पुस्तके, अनुवाद, अग्रलेख, नाटक, परीक्षणे वगैरे. Unfortunately none of that is available online. I have a few of his books. But we will try to publish some of his nonfiction writing. Thanks again.

    ReplyDelete

Welcome!

If your comment (In Marathi, Hindi or English) is NOT interesting or NOT relevant or abusive, I will NOT publish it.

Comment may get published but not replied to.

If you are pointing out a mistake in the post and if I agree with your claim, I will change the post and acknowledge your contribution.

Only if you agree to this, post your comment.