Sunday, April 08, 2018

आरशातील उत्पात आणि कल्लोळ !....G A Kulkarni and Orson Welles

"...एक सिंहासन वर येत, दोन साम्राज्य नष्ट होतात. लक्षावधी घोडे उजाड माळावरून वणव्याच्या लाटेप्रमाणे धावू लागतात व खंडं बेचिराख होतात ! प्रतिबिंबांचा प्रतिबिंबांशीच संघर्ष ! आरशातील उत्पात आणि कल्लोळ !..." 

जी ए कुलकर्णींच्या 'प्रवासीं ('रमलखुणा', १९७५) कथेतील एक विलक्षण प्रसंग (पृष्ठ २६-३५) म्हणजे प्रवाशाचे त्याच्या कुत्र्यासोबत शिकाऱ्याच्या आरसेगृहातील (House of mirrors) आगमन आणि सुटका.

इतक्या वेळा वाचून सुद्धा मला त्याचे सगळे पैलू समजले असे वाटत नाही. अदभुत आणि चिरंतन याची सांगड जीए ज्या कौशल्याने घालतात त्यामुळे त्याचे लेखन इतक्या वर्षानंतर सुद्धा ताजे वाटते, हटके वाटते.

अस आरसेगृह जीएंच्या आयुष्यात लहानपणीच, ते जेंव्हाजेंव्हा जत्रेला गेले असतील, त्या त्या वेळी आले असेल. पण मला वाटत की जीएंना ऑर्सन वेल्स यांच्या 'दि लेडी फ्रॉम शांघाय', १९४७ मधील हाऊस ऑफ मिरर्स सुद्धा लक्षात असणार.

जीएंच्या भाव आणि कला जीवनावर हॉलीवूडचा, एकूणच चांगल्या चित्रपटांचा  खूप प्रभाव होता अस मला त्यांची पत्रे वाचल्यापासून कायम वाटत आले आहे.

शिवाय जीए स्वतः एक चित्रकार असल्यामुळे ते त्यांच्या लेखनात अनेक प्रभावी चित्रवत प्रतिमा निर्माण करतात. अशा कलाकारावर चित्रांचा आणि इतर visual arts चा प्रभाव इतर लेखांकांपेक्षा अमळ जास्त असणे सुद्धा सहाजिक आहे.

'प्रवासी'तील आरसेगृहातील वर्णन म्हणजे एखाद्या निष्णात पटकथालेखकाने एखाद्या उत्तम सिनेदिग्दर्शकासाठी लिहल्यासारखे आहे. 




Everett Sloane, Orson Welles, and Rita Hayworth in the final scene at a house of mirrors from

‘The Lady from Shanghai’, 1947 

Courtesy: Columbia Pictures