Thursday, August 16, 2018

क्रिकेटच्या मैदानावर ते....The Joy Ajit Wadekar Gave To Me

#AjitWadekar

"तुम्ही अवतरले गोकुळी आम्ही गोपाळांच्या मेळी
तुम्ही होते रामराजा आम्ही वानरांच्या फौजा"


"तुम्ही अवतरले वेस्टइंडीजी आम्ही तुमच्या फॅनमेळी
तुम्ही होते इंग्लंडचे राजा आम्ही  वानरांच्या फौजा"


एका ठराविक वर्षाच्या नंतर जन्माला आलेल्या भारतीयांना अजित वाडेकरांचे महत्व कदाचित समजणार नाही.

१९७१-७२ काळातील अभूतपूर्व विजयी अशा टेस्ट क्रिकेट टीमचे कॅप्टन, बॅट्समन आणि फिल्डर तर ते होतेच, पण त्यांचा दबदबा माझ्या सारख्या रणजी ट्रॉफी फॉलो करणाऱ्या लोकांमध्ये केंव्हापासूनच होता.

१९६९ साली ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दिल्लीमधील संस्मरणीय विजयात त्यांची  कामगिरी मोठी होती.  मी ९ वर्षाचा होतो आणि माझ्या आयुष्यातील एक सर्वोच्च आनंदाचा तो क्षण होता, अजूनही आहे.

वाडेकर यांच्या अजून दोन-तीन खाजगी अशा आठवणी आहेत.

मिरजेला त्यांचे १९७२-७३ साली रोटरी-लायन असे कुठेतरी भाषण झाले होते आणि मी ते बऱ्यापैकी जवळून ऐकले होते. त्यांनी संयोजकांना विचारले की मराठीत बोलू की इंग्लिश. त्यांना इंग्लिश चॉईस देण्यात आला. कुठंही गर्व नाही, नर्म विनोदी पद्धतीने , मिश्किल चेहरा ठेवून त्यांनी छान भाषण केले होते. त्यांनी जितेंद्र सारखी घातलेली अत्यंत टाईट नॅरो बॉटम पॅण्ट अजून आठवते.

वाडेकर स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीला होते. १९७१-१९७३ च्या सुमारास त्यांच्या बँकेने शाळेतील मुलांसाठी बँक खाते काढण्याची योजना सुरु केली होती. मी त्यात उत्साहाने खाते सुरु केले कारण प्रत्येकाला वाडेकरांच्या सहीची कॉपी असलेल, बॅटसारख दिसणार, प्लास्टिकच पेन मिळणार होत. तो पेन मिळालेला दिवस आजही आठवतोय. ते पेन मी न वापरता कित्येक वर्षे जपून ठेवले होते. बँक खात सुद्धा मी मिरज सोडेपर्यंत , १९८४, चालू होत. 

माझ्या आत्याने मला त्यांचे अनुवादित आत्मचरित्रात्मक पुस्तक १९७२ साली दिले होते - त्याचे शीर्षक होते : "क्रिकेटच्या मैदानावर मी"... आता ते फार मोठ्या मैदानावर खेळायला  गेले आहेत....


No comments:

Post a Comment

Welcome!

If your comment (In Marathi, Hindi or English) is NOT interesting or NOT relevant or abusive, I will NOT publish it.

Comment may get published but not replied to.

If you are pointing out a mistake in the post and if I agree with your claim, I will change the post and acknowledge your contribution.

Only if you agree to this, post your comment.