Tuesday, April 18, 2017

'ब्रिटिश लेखक बिनडोक आहेत'...बेपर्वा शेरेबाजी?...Vilas Sarang

एप्रिल १४, २०१७ ला  विलास सारंगांचा दुसरा स्मृतिदिन होता

विलास सारंग, 'लिहित्या लेखकाचं वाचन', २०११:

"...(अशोक) शहाणेंच्या 'क्ष- किरण' लेखाने बेपर्वा शेरेबाजी करण्याची पद्धत रूढ केली. ती इतरांबरोबरच (भालचंद्र) नेमाडेंनी आपलीशी केली..." (* तळटीप पहा)

"...सौन्दर्य शास्त्र  हे एक मायाजाल आहे व त्यापाठी लागून कितीकांनी  आपले शब्द वाया घालवले. मराठीला जरूर होती  संहितांचं  सूक्ष्म , कठोर परीक्षण करण्याची ..." 

मराठीतील द ग गोडसे, म वा धोंड,  विलास सारंग, वसंत सरवटे, दुर्गा भागवत आणि माझे वडील या लोकांमुळे समीक्षा हा प्रकार मला आवडायला लागला. सारंगांच्या सूचनेप्रमाणे मी फक्त जमेल तसे संहितेचे सूक्ष्म परीक्षण करतो.  सौन्दर्य शास्त्र म्हणजे काय हे मला माहिती सुद्धा नाही. मराठीतील आघाडीचे समीक्षक कित्येकदा काय म्हणत असतात हे मला जरा सुद्धा समजत नाही. मला माहित-आठवत  असलेल्या सगळ्या गोष्टींची- गद्य, पद्य, चित्र, शिल्प वगैरे - सांगड घालायचा प्रयत्न करतो. माहित नसलेले होईल तेव्हढे- online, offline- वाचतो. इंग्लिश जास्त वाचतो.

सारंगांची समीक्षेची पुस्तके म्हणजे अलिबाबाची गुहाच...प्रत्येक लेख खचाखच माहिती आणि निरीक्षणांनी भरलेला...त्यातून दिसणारी त्यांची बुद्धिमत्ता, विनोद बुद्द्धी, विद्वत्ता, इंग्लिश-मराठी भाषा प्रभुत्व....आपल्या आजाराबद्दल बोलताना कायम एक मिश्कील आवाज, जो कधीही सेंटीमेंटल होत नाही (स्वतःच्या कुटंबाबद्दल मात्र जवळ जवळ शांतताच पाळतात)....कुठलेही पुस्तक उघडून कुठेही वाचायला सुरु करा...एखाद मधुर गाण कुठूनही ऐकता येत तस...

'गुहे'त एक दोन दालनांचा अभाव मात्र प्रकर्षाने जाणवतो...सायन्स फिक्शन आणि ग्राफिक नॉवेल या प्रकारात जन्माला आलेल्या जगातील महान कलाकृतींबद्दल सारंग काहीच बोलत नाहीत...फिलिप के डिक (Philip K. Dick), जे जी बॅलार्ड (J G Ballard), अॅलन मूर (Alan Moore), आर्ट स्पीगलमन (Art Spiegelman)- मधले दोघ ब्रिटिश- कसे सुटले त्यांच्या नजरेतून?

दृश्य कलांबद्दल पण सारंग  क्वचितच लिहताना आढळतात... ठणठणपाळाबद्दल - कौतुकाने आणि थोड शिष्टपणे - लिहतात पण वसंत सरवटेंचा उल्लेख न करता:  'क्लोज रिडींग' मध्ये 'क्लोज वॉचिंग' येत नसाव!

... आणि त्यांची सगळीच मते पटतात असेही नाही...एक उदाहरण:

"...ब्रिटिश लेखक बिनडोक आहेत. त्यांना 'थीम' वगैरेची गंधवार्ता नाही..." असं ज्यावेळी सारंग लिहतात (पृष्ठ ४५, Ibid), त्यावेळी त्यांनी जोसेफ कॉनरॅड वाचला- क्लोज रिडींग  तर सोडाच- तरी आहे का याची शंका वाटते (अर्थात कॉनरॅडना ते पोलिश म्हणू शकतात!) कारण 'आतंकवादाच्या जमान्यात'  या लेखात त्यांचा उल्लेखही नाही. गेल्या दीड-दोनशे वर्षातील जगातील सगळ्यात मोठा द्रष्टा कादंबरी- कथा-लेखक म्हणून आज कॉनरॅड यांच नाव घेतल जात.

कॉनरॅड व्यतिरिक्त- फक्त विसाव्या शतकातील कथा, कादंबरीकार बोलायच तर- जॉर्ज ऑरवेल, ऑल्डस हक्सली, एवलिन वॉ, ग्रॅहम ग्रीन (आणि वर आलेले जे जी बॅलार्ड, अॅलन मूर)  : सगळे बिनडोक? कोणालाच  'थीम' वगैरेची गंधवार्ता नाही?

ज्या रशियन क्रांतीला या वर्षी १०० वर्षे पूर्ण होत आहेत, त्या क्रांतीचा मुडदा कसा पडला हे पहिल्यांदा ऑरवेलनी सर्वात प्रभावीपणे जगासमोर आणल, आणि ते सुद्धा एक पॅराबलच्या माध्यमातून.  १९४५ पासून त्या पुस्तकाची आजपर्यंत जगभरात अभूतपूर्व विक्री झाली आहे. ऑरवेलांचे 'Nineteen Eighty-Four', १९४९ साली प्रसिद्ध झालेले पुस्तक पुन्हा एकदा या वर्षी, २०१६-२०१७, जगात बेस्टसेलर झाल आहे...

आता प्रश्न असा येतो: "...ब्रिटिश लेखक बिनडोक आहेत. त्यांना 'थीम' वगैरेची गंधवार्ता नाही..." याला 'बेपर्वा शेरेबाजी' म्हणत दुर्लक्ष करायच का आम्ही?

आणखी एक-दोन  निरीक्षण.

सारंग त्यांच्या 'अक्षरांचा श्रम केला', २००० मध्ये दुर्गाबाईंचा उल्लेखही करत नाहीत (मी स्वतः ते पुस्तक दोन-तीन वेळा कव्हर-टू-कव्हर वाचले आहे. ही पोस्ट लिहताना पुन्हा दोन-तीन वेळा दुर्गाबाईंसाठी चाळले. तुम्हाला काही वेगळे आढळल्यास जरूर कळवा.)... दुर्गाबाई त्यांना, त्यांनी बुद्धाचा ध्यास घेतल्यानंतर- त्याला मी दुसरा टप्पा म्हणतो- खऱ्या अर्थाने 'सापडल्या' असाव्यात आणि मग ते दुर्गाबाईंचे मोठे फॅन झाले...तस पहिल तर दुर्गाबाईंचे जवळपास सर्व लेखन 'अ.श्र.के.' प्रकाशित होण्याच्या आधी झाले होते.

पुढील लेखकांचा  उल्लेखही सारंग त्यांच्या समीक्षेंच्या पुस्तकात करताना मला दिसत नाहीत:  अण्णासाहेब किर्लोस्कर, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, चिं वि जोशी (ज्यांची जवळजवळ सर्व पुस्तके आज बाजारात विकत मिळतात), नाट्यछटाकार दिवाकर (दुर्गा भागवत, विजय तेंडुलकर, सदानंद रेगेंचे आवडते), वसंत सरवटे (केवळ एक लेखक म्हणून, चित्रकार म्हणून तर नाहीच नाही, सरवटेंनी एका वर्तमानपत्राला लिहलेल्या पत्राचा उल्लेख एकदा आला आहे.), गोविंदराव टेंबे (अभिजात संगीताचे भारतातले आघाडीचे समीक्षक आणि एक विचारी म्हणून), 'बहुरुपी'कार चिंतामणराव कोल्हटकर जे सारंगांसारखेच मराठीभाषाप्रभु होते...  त्यांनी हे लेखक वाचलेच नाहीत का?  का 'पहिल्या टप्प्यातील' दुर्गाबाईंसारखे ते त्यांना कधी महत्वाचे वाटले नाहीत?...

द ग गोडशांचा संगीत सौभद्र आणि अण्णासाहेब किर्लोस्करांचे लेखक म्हणून प्रकट झालेल कौशल्य यावरचा लेख: 'शतायुषी सौभद्र' त्यांनी वाचलाच नाही? गोडशांचा उल्लेख थोड्या कुत्सीत पणे 'औदुंबर' कवितेवरच्या लेखात मात्र येतो. याउलट ह ना आपटे, ना सी फडके आणि विसाव्या शतकातील कितीतरी (डझनाने) बऱ्यावाईट मराठी स्त्री-पुरुष लेखकांचे उल्लेख, त्यातील काही पोलिटिकल कऱेक्टनेससाठी, त्यांच्या लिखाणात येतात... काहीही असो, ही दुर्दैवी गोष्ट आहे....

सारंगांच्या गुहेतील मला आवडलेले एक रत्न... त्यांनी लिहलेला मोबी-डिक (१८५१) आणि मराठी वाचक यांचा संबंध:
"...मराठी वाचकांनी तर मोबी डिकसारखी कादंबरी वाचलीच नसती. (त्यांना वांती झाली असती) मोबी डिकमधली काही वर्णनं मोठमोठं व्हेल मासे कापण, भल्या मोठ्या परातीत ते तळण, धुराचा उग्र वास आणि हे सगळं रात्रीच्या काळोखात; अक्षरशः नरकाचं (Hell) वर्णन शाकाहारी वाचकांना 'टू मच' वाटेल..." (Ibid)

खालील अप्रतिम व्यंगचित्र दुसऱ्या एका अर्थाने असे पाहता येईल: कॅप्टन अहाब यांची कॉमेंटरी सुरु आहे...त्यांना थोडा सुगावा लागलाय आपल्या पाठी काय आलय याचा... बेपर्वा शेरेबाजीचे परिणाम महाकाय मोबी-डिक सारखे  मागे लागू शकतात!


कलाकार: Benjamin Schwartz, The New Yorker

* आता हे प्रसिद्ध झाले आहे की श्री. शहाणेंचा लेख त्यांनी श्री. नेमाडेंच्या साथीत लिहला होता.  पहा माझी ऑक्टोबर २७ २०१३ची पोस्ट 'Ashok Shahane Confesses and I Feel Cheated'. 

4 comments:

  1. लेख आवडला. असेच, थोडेतरी दीर्घ लिहीत जा, अशी नम्ब्र (;-)) विनंती!

    ReplyDelete
  2. Thanks, I will try but I follow Twitter-meter to measure!

    ReplyDelete
  3. एका साक्षेपी समीक्षकांच्या लिखाणावर तेवढीच ताकदीची समिक्षा

    ReplyDelete

Welcome!

If your comment (In Marathi, Hindi or English) is NOT interesting or NOT relevant or abusive, I will NOT publish it.

Comment may get published but not replied to.

If you are pointing out a mistake in the post and if I agree with your claim, I will change the post and acknowledge your contribution.

Only if you agree to this, post your comment.