Thursday, January 05, 2017

सर्वत्र डेलिया आणि वांड गोडसे बसलेले असतात...Remembering D G Godse

आज जानेवारी ५ २०१७, द ग गोडशांची पंचविसावी पुण्यतिथी आहे. 

दीपक हणमंतराव कन्नल:
"...नैसर्गिक वाढीमध्ये फुटणारे नवे घुमारे मराठी समीक्षेत क्वचितच दिसतात. त्यातून मर्ढेकर-गोडसे यांसारखे मनस्वी, त्यांच्याच शब्दात सांगावयाचे तर 'वांड', औचित्यविचाराची मर्यादाही निःशंकपणे ओलांडणारे अभ्यासकही जवळजवळ नाहीतच..." 
(पृष्ठ १५१, 'द. ग. गोडसे यांची कलामीमांसा', संपादक: सरोजिनी वैद्य, वसंत पाटणकर, १९९७)

मराठी लिहणाऱ्यांमध्ये गोडशांसारख पूर्वी कोणी नव्हत आणि आतातर अजिबात नाहीये.

रॉबर्ट ह्यूज (Robert Hughes, 1938-2012), जॉन बर्गर (John Berger, 1926-2017)  यांच्या सारख्यांच्या  योग्यतेचा हा माणूस: "Raising criticism to the level of art, his writing was noted for its power and elegance", "The enduring mystery and relevance of art; the lived experience, both of the free and the oppressed; by combining these interests, Berger’s art criticism transcends its genre to become a very rare thing—literature"....

असतील त्यांच्या लेखनात उधळले तर्कांचे घोडे (समंदे तलाश!), पण त्या 'घोड्यांनी' कलास्वादाच्या दिशा मला दाखवल्या आहेत, भूतकाळाकडे कसे पाहता येईल याचे मार्गदर्शन केले आहे, एकाच चित्रांत कसा एखाद्या कालखंडाचा इतिहास आणि त्याचवेळी त्याच्या विकृतीकरणाचे प्रयत्न अशा दोन्ही गोष्टी दिसू शकतात याचे विवेचन केले आहे.

त्यांचे 'मस्तानी' हा वस्तुनिष्ठ इतिहास नाहीच आहे पण एक कलाकृती म्हणून त्याचे मोठे महत्व आहे. मध्ययुगीन स्त्रीकडे बघण्याचा तो एक हृद्य प्रयत्न आहे. टी एस इलियटच्या "you do not know/
The unspoken voice of sorrow in the ancient bedroom/ At three o'clock in the morning" ची आठवण करून देणारा.

'शक्तिसौष्ठव'च पण तसच. कितीतरी त्यांनी त्यात मांडलेले सिद्धांत चुकीचे असतील. पण माझ्या सारख्याला १७व्या शतकातील महाराष्ट्राची कलावैशिष्ट्ये त्यामुळे समजली. ताजमहाल आणि रायगड हे आपापल्यापरीने कसे सुंदर आहेत हे समजले. तुकाराम, रामदास यांचे रसग्रहण जास्त चांगले करता आले.

अशी उदाहरण अजून बरीच देता येतील: शिवाजी महाराजांच डच चित्रकारान काढलेले चित्र, संगीत सौभद्र, दीनानाथ दलाल, जेम्स व्हिस्टलर (James Abbott McNeill Whistler), अष्टविनायक, शिल्पी महाराष्ट्र, भिंतीवर काढलेली चित्रे, मध्ययुगीन मराठी भाषा...इत्यादी...ती ह्या ब्लॉग वर पसरलेली आहेत. 

गोडशांचा पहिला लेख अष्टविनायकांवरचा दिवाळी अंकात (मटा?) वाचलेला... त्यानंतर पहिले पुस्तक 'शक्तिसौष्ठव' १९८४ च्या सुमारास वाचलेले...नंतर कलकत्त्याला असताना त्यांच्या बरोबर झालेला पुष्कळ पत्रव्यवहार...त्यावेळी मला त्यांचे मस्तानी प्रेम समजले....नंतर  'मस्तानी' दोन-तीनदा वाचले....मग १९९१साली चेंबूरला त्यांच्या घरी भेटायचे ठरवून, माझ्यामुळे झाले नाही...(त्यांना थोडा माझ्या कंपनीचा चहा नेवून देणार होतो).

१९९२ जानेवारीला अंजु आणि मी आसाममध्ये गेलो होतो...आसाम थंडीमध्ये अधिकच सुंदर दिसायच, डेलिया सगळीकडे बहरला होता...माझ्या कंपनीच्या एका मॅनेजरच्या बंगल्यात उतरलो होतो... ८ जानेवारी १९९२ असावा...सकाळी ब्रेकफास्ट चालू असताना, त्यावेळचे खूप खपणारे, 'धि टेलिग्राफ' दैनिक उचलले... कलकत्याचे पेपर किमान एक दिवस तरी उशिरा अपर आसाम मध्ये पोचत असत...तो ६ जानेवारीचा पेपर असावा....पहिल्याच पानावर डावीकडच्या स्तंभात बातमी - गोडसे वारले होते...

पहिल्यांदा आश्चर्य वाटले... गोडशांच्या जाण्याची बातमी पहिल्या पानावर कलकत्याच्या इंग्लीश पेपरात? वसंत सरवटे जाण्याची बातमी मी अजून टाइम्स ऑफ इंडियाच्या पुण्याच्या आवृत्तीत मुख्य पानांमध्ये पहिली नाहीये!

अंजु विणकाम करत समोरच बसली होती... गोडसे गेले म्हणालो...एक उदासी आली....बराच वेळ टिकली...

आज पुन्हा एकदा वाटत, सदानंद रेग्यांच्या भाषेत, आमची वही रोज थोडीथोडी कोरी होत चाललीय....गोडसे, धोंड, सारंग, सरवटे... यातील तिघांना/शी (सारंग सोडून) बिनधास्त लिहायचो/ बोलायचो ... आणि त्यांच्या बद्दल, होतय तो पर्यंत, बिनधास्त लिहीत राहीन...

... आणि आज गोडसे म्हटलं की पहिल्यांदा आठवतात आसामचे बहरलेले डेलियाच ... नंतर आठवते रेगेंची  त्यांच्या वरची कविता...

"....
 सर्वत्र गोडसे बसलेले असतात;
(ते अर्थात आपणांस दिसत नाहीत.)
 ....
 पाबळच्या एस्टी स्टँडवर
मस्तानी जातीनं येते
घेऊन आपल्या समाधीवरची चादर
"रफ़ू करून द्या."
गोडसे गोडसं हसतात
नि चादर हिर्वीहिर्वी जर्द होऊन जाते....
...."



वाङ्मय शोभेच्या जानेवारी १९४० च्या अंकात हे निवेदन होत :
स्पष्ट उल्लेख मला सापड्ला नसला तरी, खालील, जानेवारी १९४०चे, उत्कृष्ट मुखपृष्ठ गोडसे (द. गो  नाही!) किंवा वसंत केळकर यापैकी एकाने किंवा दोघांनी मिळून केले आहे. 


सौजन्य: वाङ्मय शोभा, कलावंतांचे उत्तराधिकारी, बुकगंगा.कॉम 

 उजव्या बाजूच वाचाल तर लक्षात येईल की गोडश्यांनी या अंकासाठी कै. माधव ज्यूलियन (२१/१/१८९४-२९/११/१९३९), ज्यांचे नुकतेच चटका लावणारे - केवळ ४५व्या वर्षी- निधन झाले होते, यांचे रेखाचित्र काढले होते. ते मात्र मला ऑनलाईन अंकात मिळाले नाही.

2 comments:

  1. आपण ज्यांच्यावर सातत्याने लिहिता ते म्हणजे कै. द. ग. गोडसे आणि नुकतेच निधन पावलेले कै. वसंत सरवटे. त्या दोघांपैकी कै. गोडसे हे काहीसे अपरिचित असे परंतु विलक्षण असे व्यक्तिमत्त्व आहे. म्हणून तुमचे त्यांच्यावरील लेख मला वाचावेसे वाटतात.
    मंगेश नाबर

    ReplyDelete

Welcome!

If your comment (In Marathi, Hindi or English) is NOT interesting or NOT relevant or abusive, I will NOT publish it.

Comment may get published but not replied to.

If you are pointing out a mistake in the post and if I agree with your claim, I will change the post and acknowledge your contribution.

Only if you agree to this, post your comment.