Saturday, August 22, 2026

मराठीत श्लील-अश्लीलआणि तुरुंगाची भीती ...What is Obscene Art and Literature?

श्री अमिता दलाल राजाध्यक्ष यांनी मला श्री सुहास बहुळकर यांचे "चित्रकार दीनानाथ दलाल : चित्र आणि चरित्र " हे २०२२ साली प्रसिद्ध झालेले पुस्तक भेट म्हणून पाठवले होते. 
 
त्या मध्ये पान ४३ वर, सोबतचे , एका अर्थाने दलालांची सलामी (debut) म्हणून पाहता येईल असे, मूळ चार रंगी असलेले, पण पुस्तकात काळे-पांढरे असलेले सत्यकथेच्या नोव्हेंबर १९३९ च्या मुखपृष्ठावर प्रसिद्ध झालेले चित्र आहे. (मराठीतील एकेकाळी आघाडीचे आणि सतत चर्चेत असलेले सत्यकथा मासिक अनेक मराठी मासिकांप्रमाणे केंव्हाच बंद पडले)....
 
  
सुहास बहुळकर म्हणतात त्या अंकात दलालांची बारा चित्रे आली होती आणि ह्या चित्राबाबत श्लील-अश्लील ह्या निमित्ताने किमान दबक्या आवाजात चर्चा झाली होती. 
 
मराठीत श्लील-अश्लील हे धोकादायक खाद्य कित्येक दशके लोकांना पुरले आहे, हे इंग्लंड मधील व्हिक्टोरियन मूल्यांमुळे आपल्याकडे आले आणि फोफावले. 
 
माझ्या वडलांनी १९६३ च्या सुमारास त्यांच्या २७व्य वर्षी "धोका! हमरस्ता पुढे आहे" ह्या नावाची कादंबरी लिहली. ती कादंबरी मी एक दोनदा वाचली आहे. त्यात मला फक्त एक existential sadness दिसतो , वेश्या असून शृंगार कधी दिसत नाही. 
 
पण त्याचे मुखपृष्ठ R S Kantak (र. स. कंटक) यांनी अत्यंत आकर्षक काढले आहे , ज्यात अर्धनग्न स्त्री आहे. मला पुस्तकापेक्षा कंटकांचे मुखपृष्ठ (जे इथे थोडे कात्री लावून दिले आहे) जास्त आवडले होते.  
 

त्या कादंबरीवर प्रचंड, घणाघाती , बहुदा फक्त मुखपृष्ठ पाहून आणि कांदबरी न वाचता झाली. पुस्तक न वाचता त्यावर टीका करण्याची परंपरा भारतात फार जुनी आहे. 
 
त्या टीकाकारात जयवंत दळवी होते (आठवा चक्र, १९८१ सिनेमा)...(माझ्या वडलांनी दळवींना ह्या टीकेची आठवण, दळवींच्या शेवटच्या वर्षांत , ठणठणपाळावर कौतुक करणारा लेख लिहून, त्यांना त्याची प्रत पाठ्वताना करून दिली होती, ज्याची दिलखुलास कबुली दळवींनी पत्रोत्तरात दिली होती.)....
 
१९४०-५५ च्या दरम्यान बा सी मर्ढेकरांना (म वा धोंड यांचे या विषयावरचे लेखन पहा , मर्ढेकर हादरले होते) / र धो कर्वेंना श्लील -अश्लील वादात कदाचित जेल झाली असती. त्यामुळे तो प्रकार झटकून टाकण्यासारखा नव्हता. तसे झाले असते तर माझ्या वडलांच्या तीन लहान मुले असलेल्या, इतर कुठलाही आधार नसलेल्या कुटुंबाचे प्रचंड हाल झाले असते....
 
दि के बेडेकरांसारखे लोक माझ्या वडलांच्या रक्षणार्थ (लेखन स्वातंत्र्य वगैरे) धावून आले. आणि ते वादळ शमले. पण माझे तरुण आणि आर्थिक दृष्ट्या असुरक्षित वडील त्यातून इतके हबकले की त्यांनी तशा प्रकारची सामाजिक कादंबरी लिहलीच नाही. 
 
मला दीनानाथ दलालांच्या चित्रात काहीही अश्लील दिसत नाही. चित्रकृती अत्यंत मुलायम आणि भावपूर्ण आहे. तीचे काळे-पांढरे (black & white) रूप देखील तिचा भावार्थ सुंदररीत्या पोचवते.
 
चित्रात एक नायिका तळ्याकाठी पाण्याकडे झुकलेली दिसते. तिच्या आजूबाजूला हंस खेळत आहेत. ती स्वतःच्या प्रतिबिंबाकडे पाहतेय की हंसांशी खेळतेय — हे जाणूनबुजून अवगुंठित ठेवलं आहे. पाण्यात विलीन झाल्यासारखी तिची शरीरभाषा, हलक्या वाऱ्याने हलणारी वेल, आणि पार्श्वभूमीतील गोल अवकाश — हे सगळं मिळून चित्रात एक स्वप्नवत, कामुक पण अत्यंत संस्कृत भावविश्व निर्माण करतात.
 
ही कामुकता शरीरप्रधान नसून भावप्रधान आहे. ती "स्पर्श" पेक्षा "ओढ" आणि "कुतूहल" या भावांवर आधारित आहे. नायिकेचा वक्र देहबांध, तिची मान थोडीशी वाकलेली, आणि तिच्या हातातील हंस — ही तीन घटक एकत्र येऊन अद्वितीय संवेदनशीलता निर्माण करतात.
 
म्हणून हे चित्र अश्लील किंवा indecent अजिबात दिसत नाही. दलाल यांच्या संपूर्ण कलाविश्वात देहाचे वर्णन कधीच उघडे किंवा अविचारपूर्वक नसते. ते नेहमीच भारतीय काव्यपरंपरेतील शृंगार रसाच्या मर्यादित आणि काव्यमय भाषेत व्यक्त होते. १९३९ साली हि संवेदनशीलता प्रसूत होणे हि दलाल यांच्या प्रगल्भतेचे लक्षण आहे.
 
हे चित्र आपण 'स्वान'-संवाद असे ही म्हणू शकतो — नायिका स्वतःच्या मनाशी, स्वतःच्या प्रतिबिंबाशी किंवा स्वतःच्या भावविश्वाशी बोलतेय. त्या पाण्याच्या लहरींमध्ये ती स्वतःलाच पुन्हा शोधतेय.
 
एकूणच हे चित्र शुद्ध, संवेदनशील आणि काव्यमय आहे — अश्लीलतेपासून खूप दूर.
 
कलाकार: दीनानाथ दलाल, दलाल आर्ट स्टुडिओ
 
सौजन्य व आभार: चित्रकार दीनानाथ दलाल मेमोरियल समिती, दलाल परिवार, सुहास बहुळकर
 

No comments:

Post a Comment

Welcome!

If your comment (In Marathi, Hindi or English) is NOT interesting or NOT relevant or abusive, I will NOT publish it.

Comment may get published but not replied to.

If you are pointing out a mistake in the post and if I agree with your claim, I will change the post and acknowledge your contribution.

Only if you agree to this, post your comment.