Sunday, June 14, 2026

पुनश्च कोठें भट्टी, भगवन् ....B S Mardhekar in Deepawali Magazine of 1949 and Later Poetry Book

मी जसे म्हणत आलो आहे, दीनानाथ दलाल आणि रॉय किणीकर यांनी मराठीत दीपावली सुरु करून गुलाल उधळला हे नक्की...
 
सगळे प्रथितयश लेखक/कवी (जे कदाचित एकमेकांचे तोंड सुद्धा बघत नसतील) दीपावली मध्ये लिहीत होते , त्यातील एक होते बा सी मर्ढेकर, ज्यांनी एक वेगळाच दबदबा निर्माण केला होता (पु ल देशपांडेंनी त्यांच्या आणि इतर नवकवितांची प्रचंड थट्टा केली आहे "नस्ती उठाठेव" मध्ये ....पण त्याचे कारण मर्ढेकरांचा साहित्यावरील प्रचंड प्रभाव)
 
अनेक टीकाकारांनी मर्ढेकरांवर लिहताना त्यांचा विराम चिन्हे वगैरे बद्दलचा आग्रह नमूद केला आहे ... मर्ढेकरांची त्यांनी शीर्षक न दिलेली कविता पहा (त्यांनी कोणत्याच कवितेला ते दिले नाही): "जशि धोब्याची मऊ इस्तरी"....मला त्यांच्या सगळ्या कविता नुसत्या आवडत नाहीत तर गुणगुणाव्याश्या वाटतात.....ही त्यातीलच एक....
ही कविता आज तुम्हाला "मर्ढेकरांची कविता" , १९५९ (प्रथम आवृत्ती)-१९७७ (माझ्याकडील प्रत) इथे अशी आढळेल :
"जशि धोब्याची मऊ इस्तरी
तलम फिरावी सुतावरूनी,
फाल्गुनांतील चंद्रकोर तशि
मलिन मनांच्या धाग्यांवरूनी. 
 
शिणेल धोबी यदाकदाचित् ,
पडेल खाली चंद्रकोर अन् ,
सुरकुतलेल्या मनोवृत्तिंना
पुनश्च कोठें भट्टी भगवन् !"
 
ही कविता प्रथम दीपावली च्या १९४९ सालच्या दिवाळी अंकात आली , सोबतचे चित्र पहा ....
 
मजा म्हणजे पुस्तकातील आणि मासिकातील कवितेत अवघ्या दहा वर्षांत झालेला फरक, विशेषतः मर्ढेकरांच्या विराम चिन्हात....मासिकातील अर्धविराम नाहीसा झाला आहे आणि स्वल्पविराम व पूर्णविराम आले आहेत ... उपसंपादकाच्या डुलक्या का काय माहित नाही, पण भट्टी भगवन् या दोन शब्दांमध्ये मध्ये पुस्तकात विरामचिन्ह नाही.....
 
मर्ढेकर बऱ्याच ठिकाणी दुर्बोध आहेत (एवढे का दुर्बोध आहेत कुणास ठाऊक) पण विरामचिन्हे हा वेगळा विषय आहे ....
 
मला लक्षात आले आहे की दीपावली मध्ये आलेली कविता ही जास्त योग्य, अचूक आहे , "पुनश्च कोठें भट्टी, भगवन्" हेच बरोबर आहे, कारण मर्ढेकर इतर अनेक कवितात विचारतात तसे परमेश्वराला विचारत आहेत: पुनश्च कोठें भट्टी, रे  भगवंता (पूर्वी कोळशाने इस्त्री करणे इतके कटकटीचे असायचे) ...तेंव्हा पुढे मौजेने घोळ घातला आणि स्वल्पविराम उडला असे माझे मत आत्तातरी झाले आहे ....
 
शिवाय जर मर्ढेकरांना 'भट्टी शिलगवणारा ईश्वर' असा अर्थ अभिप्रेत असता, तर त्यांनी 'भट्टी-भगवन्' किंवा 'भट्टिभगवन' असा समासासारखा शब्द वापरला असता किंवा जोडशब्द, दीपावलीचा उपसंपादक मर्ढेकरांसारख्या मोठ्या कवीच्या केवळ आठ ओळीच्या कवितेत आपणहून स्वल्पविराम घालेल? मर्ढेकरांनी तो स्वतःच काढला असेल तर तो विषय स्वतंत्र आहे.....
 
चित्र भारी आहे , इस्त्रीच्या सपाट बाजूत धोब्याची प्रतिमा दाखवली आहे ....
 
कलाकार: दीनानाथ दलाल आणि दलाल आर्ट स्टुडिओ
 
सौजन्य व आभार: महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्था, चित्रकार दीनानाथ दलाल मेमोरियल समिती, दलाल परिवार

ही कविता दीपावली अंकाच्या १९४९ सालच्या दिवाळी अंकात बहुदा दीनानाथ दलालांच्या चित्रासकट पण १५५ वर अशी आली होती:



मासिकाची अनुक्रमणिका : 


 

 काही वर्षात मर्ढेकरांचे नाव पहिले, पहिले आले असते ....