मराठीतील एक अत्युत्तम निबंधकार म्हणजे दत्तात्रय गणेश गोडसे ...
त्यांच्या "लिहून भिंतीवर भुजंग भरला रंग चिताऱ्याकडून...." शीर्षकाच्या निबंधात ते म्हणतात :
"…बहुधा
पांढऱ्या फटफटीत कपाळाची भिंत अशुभ समजण्यात
येत असावी....ही भित्तिचित्रे म्हणजे
त्या वेळच्या बालमनाची यक्षसृष्टीच होती...भिंतीवरून दरवर्षी नव्याने काढण्यात येणारी चित्रे ही त्यावेळच्या आमच्या
बालवयात मोठे कुतूहल असे;
आणि ती काढणारे 'पेंटर'
तर आम्हाला प्रत्यक्ष परमेश्वर वाटत. दरवर्षी कोणत्या भिंतीवर कोणत्या नव्या चित्राचे लेणे चढणार याबद्दल
आम्ही उत्सुक असू. शाळकरी मित्रांच्या
संवादाचा विषय ही चित्रेच
असे. गावाच्या काही वाड्यांच्या प्रशस्त
भिंती या वार्षिक चित्र
प्रदर्शनांची उघडी सभागृहे असत..."
('नांगी असलेले फुलपाखरू', १९८९)
मी मिरजेत असताना एका विवाह मंगल कार्यालयाची सचित्र भिंत बराच वेळ थांबून पाहत असे ... पण माझे कोणी मित्र त्यात रुची घेत होते का ते मला माहित नाही ... ती माझीसुद्धा यक्षसृष्टी होती .. ती भिंत आणि चित्रे अजून ५०-६० वर्षांनंतर सुद्धा चांगली आठवतात ...
आमच्या घराजवळील दत्ताच्या देवळाबाहेर एक निष्पर्ण असे झाड होते , त्या झाडावर तीन थेटर्स च्या सिनेमांची पोस्टर्स लागत जी दार आठवड्याला , किंवा त्याच्या पटीत बदलत , त्यावर सुद्धा माझे लक्ष असे... सिनेमा हा सांस्कृतिक जीवनाचा अत्यंत महत्वाचा घटक होता ...
कॅलेंडर हा एक अत्यंत जिव्हाळ्याचा भाग होता , घरात खाली-वर मिळून तीन-चार कॅलेंडर्स तरी लागत , जी बरीच वर्षे दीनानाथ दलाल किंवा रघुवीर मुळगावकर यांची असत .. वर्षभर बरोबर राहून ते घरचा भागच होत ...
मिरजेचे भित्तिचित्रे कलावंत कोण हे मला सांगता नाही येणार पण दलाल आणि मुळगावकर आजही बरोबर आहेत ... एका अर्थाने जीवनात सातत्य असते ते अशा गोष्टींमुळे ..
ते माझ्या दृष्टीने आयुष्याचे फार मोठे घटक आहेत...माझी कोरी भिंत त्यांनी वेळोवेळी रंगवली आहे ...
रघुवीर मुळगावकर , रत्नप्रभा , १९६७
सौजन्य आणि आभार : रघुवीर मुळगावकर परिवार

