आज जुलै २९ २०२५ रोजी शि द फडणीस १०० वर्षांचे झाले..
त्यांची चित्रे मी प्राथमिक शाळेत असल्यापासून पहात आलो, ती समजावून द्यायला लागली नाहीत , त्यात कसलाही अभिनिवेश नाही , जग सुधरवून सोडतो (ज्या शिवाय सध्या मराठीत काहीही होत नाही) ही भावना तर बिलकुल नाही ....
फक्त विविध दृष्टिकोनातून तत्कालीन शहराचे एका मध्यमवर्गीय माणसाने , जो एक अप्रतिम चित्रकार आहे, केलेले निरीक्षण आहे ... पु ल देशपांडे सुद्धा तेच करत होते , पण शि दंचे कान जमिनीला जास्त लागलेले होते ...
प्रत्येक माणसाच्या जीवनात विनोद ठासून भरला आहे, हे शि दंची कला सिद्ध करते , त्यांचा विनोद थोडा तमिळ अंगाचा आहे (मी तामिळनाडूत बराच राहिलो आहे) , तो वरकरणी साधा आहे, लागट नाही, तिरकस नाही, कोटीपूर्ण नाही पण जीवनाचे तत्वज्ञान सांगून जातो ... "why so serious ?"
कै वसंत सरवटे यांच्या मुळे शि द, सरवटे आणि मी २३ डिसेंबर २००८ रोजी तीन-चार तास एकत्र घालवले आहेत आणि माझी वरील मते त्यानंतर तयार झाली ... सरवटे यांनी त्यांच्या मित्रावर प्रेमाने लिहले आहे, ते दोघेही माझ्या आवडत्या कोल्हापूरचे हा फक्त योगायोग नाही, तिथली मातीच तशी आहे ...
आज सोबत शि दंचे वाङ्मय शोभा मासिकाच्या सप्टेंबर १९५८ च्या अंकातील रेखाटन दिले आहे ( ती त्या अंकाच्या येऊ घातलेल्या दिवाळी अंकाची जाहिरात आहे) ...
अशा चित्रातून शि दंचे आपल्याला योगदान आणि दर्जा दिसून येतो, दुर्दैवाने मराठीतून "चित्र पहाणे" पूर्वीच लोप पावू लागले होते , आता पुस्तक वाचन ही संपू लागले आहे ...