Saturday, May 04, 2024

अशोकवनात सीता...Bhavanrao Shrinivasrao Pantpratinidhi and Raja Ravi Varma

अशोकवनात रावणाने सीतेला ठेवलेले आहे , हा रामायणातील सुंदरकांडातील एक महत्वाचा प्रसंग आहे...
 
औंधचे १९४७ सालपर्यंतचे राजे भवानराव श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी (१८६८-१९५१) यांच्या १९१६ सालच्या चित्ररामायणात त्यावर एक सुंदर चित्र आहे, त्या दुर्मिळ चित्ररामायणाची एक प्रत आमच्या कुटुंबाकडे आहे...
 
त्यातील एका चित्रात (https://commons.wikimedia.org/wiki/Category:Chitra_Ramayana) सीता झाडावर बसलेल्या हनुमानाला भेटताना दाखवली असून , तिच्यावरील पहारेकरी स्त्रिया आजूबाजूला झोपलेल्या दाखवल्या आहेत, ते मला इतके मजेचे वाटे की, कधी घरातील नातेवाईक स्त्रिया दुपारी लोळत झोपलेल्या पाहिल्या तर मी त्यांना म्हणत असे - अगदी अशोक वनाचा सीन झाला आहे!
 
 

त्या विषयावर राजा रवी वर्मा यांनी काढलेले १८९४ सालचे चित्र आज पहिले, सीता तर विलक्षण सुंदर आहेतच पण पहारेकरी स्त्रिया सुद्धा देखण्या आहेत... त्या स्त्रिया अर्थातच सध्याच्या श्रीलंकेतील अजिबात वाटत नाहीयेत... "राक्षसी" दिसणे असा एक समज होता, त्या नुसार त्या काढल्या आहेत, पण त्यांचे सौन्दर्य त्यातूनही दिसत आहे...आपल्या समाजात आता फक्त गोरेपणा (जो माझ्या लहानपणी प्रचंड महत्वाचा होता) म्हणजे सौन्दर्य हा समज सुद्धा कमी होवू लागला आहे... 
 
वेगवेगळ्या देशातील खेळाडू, कलाकार आता आपल्याला आवडतात... 
 
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रात (आणि इतर भारतात सुद्धा) पूर्व आफ्रिकेच्या किनाऱ्यावरून येऊन स्थायिक झालेल्या लोकांची संख्या नगण्य नव्हती (मलिक अंबर हे त्यातील सर्वात महत्वाचे नाव)...
मी असे वाचले आहे की नाना फडणवीसांनी त्यांच्या- १८०० सालच्या- मृत्यूनंतर स्वतःच्या पत्नीची सुरक्षा करण्यासाठी पूर्व आफ्रिकेतील लढवय्यांचे दल ठेवले होते. तेंव्हा अशा गोष्टीचे संस्कार सुद्धा १९व्या शतकातील चित्रावर होणे साहजिक आहे..
 
वर्मा यांनी कळत न कळत आपल्याला शिकवले आहे की पहा आपल्या सारखी न दिसणारी माणसे सुद्धा किती सुंदर असू शकतात...