माझ्या लहानपणी मी "संपूर्ण चातुर्मास" ह्या मराठीतील एका सर्वाधिक खपाच्या पुस्तकातील कहाण्या वारंवार वाचत असे, कारण मला सतत वाचायला काहीतरी लागत असे.
त्या काळात त्या सर्व मला पाठ होत्या. आजही सर्व लक्षात आहे. मराठीचा तो एक मोठा सांस्कृतिक ठेवा आहे. त्या किती प्राचीन आहेत याची मला , भोंडल्याच्या गाण्यांसारखीच कल्पना नाही.
त्यातील माझी सर्वात आवडती कहाणी होती/ आहे "शुक्रवारची कहाणी". ती कहाणी मला इतकी आवडत असे की मी तिचा उस्फुर्तपणे वाक्प्रचार म्हणून किंवा दाखला द्यायला वापरत करत असे.
मला माहित नव्हते की जसा भारतात काळ जाईल, तसे ती कहाणी भारताच्या मध्यमवर्गीयांचे रूपक म्हणून सर्वात जास्त लागू ठरेल. सध्या माझ्या सर्वत्र "श्रावण शुक्रवारची कहाणी" सुरु असते. पैसा आणि रूप हे बहुतेक मराठी मध्यमवर्गीय समाजाचे दोनच यशाचे आणि सुखाचे मानदंड होऊन बसले आहेत.
त्या कहाणीचा छोटा भाग वाचा:
"... इतक्यांत जेवायचीं पानं वाढलीं. ताईचं पान आपल्या शेजारीं मांडलं. भाऊ जेवायला बसला. ताईनं आपली शालजोडी काढून बसल्यापाटीं ठेवली. भाऊ पाहूं लागला. मनांत कल्पना केली, शालजोडीनं उकडत असेल म्हणून काढीत असेल. नंतर ताई आपले दागिने काढू लागली. बसल्यापाटीं ठेवूं लागली. भावानं विचार केला, जड झाले, म्हणून काढीत असेल, नंतर ताईनं भात कालवला, मोठासा घांस केला, तो उचलून सरीवर ठेवला, भाजी उचलून ठुशीवर ठेवली. लाडू उचलून चिंचपेटीवर ठेवला. जिलबी उचलून मोत्यांच्या पेंद्यावर ठेवली.
भावानं विचारलं, “ताई ताई, हें काय करतेस?” ती म्हणाली, “दादा, मी करतें हेंच बरोबर आहे. जिला तूं जेवायला बोलावलंस तिला भरवतें आहे.” भाऊ कांहीं हें समजेना. त्यानं तिला पुन्हां सांगितलं, “अग ताई, तूं आतां जेवू तरी.” तिनं सांगितलं, “बाबा, हें माझे जेवण नाहीं, हें या लक्ष्मीचं जेवण आहे...."