Saturday, November 11, 2023

दुर्गाबाई, जी. ए आणि नवपरिवर्तन....Durga Bhagwat, G. A. Kulkarni and the Hero

 

दुर्गाबाई भागवतांची अनेक पुस्तके वाचून माझ्या एक गोष्ट लक्षात आली होती की त्यांनी जी. ए. कुलकर्णी यांच्या वाङ्मयाबद्दल मतप्रदर्शन केलेले नाही... 
 
'ऐसपैस' मध्ये तर प्रतिभा रानडे त्यांच्या समोर जी एंचा विषय काढतात पण त्यावर दुर्गाबाईंचे भाष्य होत नाही ... याचे मला काही वर्षे कुतुहूल वाटत आले ... 
 
परवा वॉल्डेन बुक स्टोअर Walden Book Store मधून "शासन , साहित्यिक आणि बांधिलकी", १९८८/२०१८ हे दुर्गाबाईंचे पुस्तक मागवले.... दुर्गाबाईंनी (बहुदा) १९८४ साली दिलेल्या तीन व्याख्यानांवरती आधारित ते पुस्तक आहे ... बहुदा कारण नक्की तारखा पुस्तकात कोठेही दिल्या नाहीत ... 
 
त्यातील पृष्ठ १२५ वर ठळक परिच्छेद आहे : "जी. एं. ची कैरी कथा"... काय आनंद झाला म्हणून सांगू ... माझी जीएंची सर्वात आवडती कथा कदाचित दुर्गाबाईंची सुद्धा जीएंची सर्वात आवडती कथा असू शकेल... हा परिचछेद आहे पुस्तकातील चौथ्या प्रकरणात "स्वाधीनता आणि आम्ही".... 
 
दुर्गाबाई जीएंचा फार मोठा बहुमान करत त्यांना म्हणतात : ते स्वाधीन लेखक आहेत... 
 
जी. ए. स्वाधीन लेखक आहेत म्हणजे काय?
 
त्याची एक महत्वाची कसोटी:
 
"... मनुष्य निव्वळ पारदर्शक प्रामाणिक हवा. इतरांशी पण मुख्यतः आणि विशेषत्वाने स्वतःशी. इतरांना त्याने फसविता कामा नये आणि स्वतःलाही फसविता कामा नये. सर्व प्रकारची आत्मवंचना त्याला टाळता आली पाहिजे..."
 
जी. ए. असे लेखक आहेत...
 
त्यांनी लिहलेल्या शेकडो पत्रांतून ही गोष्ट आणखीच अधोरेखित होते...
 
मला जीएंच्या अनेक गोष्टींबद्दल मतभेद आहेत, पण मला त्यांची सगळ्यात आवडणारी गोष्ट : त्यांचा "निव्वळ पारदर्शक प्रामाणिकपणा"
 
जीएंच्या "कैरी"तल्या मुलामध्ये मी स्वतःला पाहतो... 
 
माझी आयुष्याची पहिली जवळ जवळ २१ वर्षे मिरज शहरामध्ये गेली... अत्यंत प्रेम, माया, लाड करणारी, अत्यंत सुंदर दिसणारी आई मला माझ्या वयाच्या ४६ व्या वर्षांपर्येत मिळून सुद्धा मी त्या मुलाच्या आयुष्यातील अनिश्चितता समजतो... 
 
कारण माझ्या आईच्या दोन सर्जरी झाल्या एक (बहुदा) १९७२ साली आणि दुसरी १९७८ साली... दोन्ही थोड्या परिस्थिती गंभीर झाल्या नंतर... दोन्ही मध्ये , विशेषतः १९७८ मध्ये आई जाऊ शकत होती... त्यावेळी मी इंजिनीरिंग च्या दुसऱ्या वर्षाला होतो आणि माझे वडील अत्यंत चिडके/ अधिक रागीट/ deeply frustrated झाले होते, ... 
 
भारतातील बहुतेक मध्यमवर्गीयांची आर्थिक स्थिती १९४७ पासून १९९५ पर्यंत ओढाताणीची असे, त्या गोष्टीचा माझ्या वडलांच्या वागण्यावर मोठा परिणाम झाला होता... बहुतेक गरीब लोकांना दोन वेळचे पोटभर चांगले जेवण सुद्धा मिळत नसे...
 
आणि माझी आई गेली असती तर माझे आयुष्य कैरीतील मुलाच्या बरेच जवळ जाऊं शकले असते ..
 
त्यामुळे कैरी पहिल्यांदा १९८२ साली वाचल्यावर एका प्रकारे हायसे वाटले, आपण वाचलो म्हणून.. तो पर्यंत आई मुळे माझ्या हातात नैसर्गिकरित्या पिकलेला आमच्या मिरजेचा (म्हणजे कोकणातून आलेला) अस्सल हापूस किंवा पायरी होता, कैरी नव्हे!
 
Nassim Nicholas Taleb:
 
"... My very first impression upon a recent rereading of the Iliad, the first in my adulthood, is that the epic poet did not judge his heroes by the result: Heroes won and lost battles in a manner that was totally independent of their own valor; their fate depended upon totally external forces, generally the explicit agency of the scheming gods (not devoid of nepotism). Heroes are heroes because they are heroic in behavior, not because they won or lost...." 
(Fooled by Randomness, 2001)
 
दुर्गाबाईंना जीएंची रूपक कथा खूप आवडते ज्यावेळी ते पाश्चात्य परीकथा व पुराकथा पचवून त्यांचे नवपरिवर्तन आपल्या कथांमधून करतात.
 
दुर्गाबाईंच्या मते, वर Taleb यांच्या quote मध्ये आलेल्या, पाश्चात्य परीकथा व पुराकथा मधल्या "वीर नायकाला सक्तीनेच स्वतःचे घर सोडावे लागते कारण बाप आपल्या मुलाचे व्यक्तित्व खच्ची करतो हा आजवरचा जगाचा अनुभव."... आणि मग तो धोका पत्करून, शौर्य गाजवून अमृतफळ, सुवासिक पाणी , गुलाबकावलीचे फूल असे काही अद्भुत, अप्राप्य आणि त्या बरोबर त्या वस्तूची मालकीण सुंदर राजकन्या मिळवून'परत घरी येतो. 
 
दुर्गाबाईंना कैरीतील मुलगा प्राचीन हिरोची नवी आवृत्ती वाटते.
 
मात्र आजच्या हिरोला आपला मावशीकडील प्रवास अर्ध्यावरच सोडायला लागतो आणि परत मामाच्या घरी यावे लागते... हाती अमृतफळ पडत नाही तर पडते न पिकलेला आंबा म्हणजे कैरी....
 
"ही कथा शोकाची भावनाच नव्हे कारुणाची संथ लयसुद्धा निर्माण करते." (दुर्गाबाई गौतम बुद्धाच्या करुणे कडे नेहमी येत असतात)
 
पण हाती कैरी पडली म्हणून काय झाले? Heroes are heroes because they are heroic in behavior, not because they won or lost...
 
कैरीतील मुलगा हिरो आहे, त्याच निकषाने मी हिरो नाही कारण मी कधी त्याच्या वयात अशा प्रवासाला बाहेर पडलोच नाही...
 
Joseph Campbell:
"... The modern hero, the modern individual who dares to heed the call and seek the mansion of that presence with whom it is our whole destiny to be atoned, cannot, indeed must not, wait for his community to cast off its slough of pride, fear, rationalized avarice, and sanctified misunderstanding. “Live,” Nietzsche says, “as though the day were here.” It is not society that is to guide and save the creative hero, but precisely the reverse. And so every one of us shares the supreme ordeal—carries the cross of the redeemer—not in the bright moments of his tribe’s great victories, but in the silences of his personal despair." 
 
(The Hero with a Thousand Faces, 1949)
 
काय योगायोग पहा! मी आयुष्यात फक्त दोन मराठी लघुकथा लिहल्या ज्या "अभिरुचि" मासिकात मार्च-एप्रिल १९८४ मध्ये आणि जान-फेब १९८५ मध्ये प्रसिद्ध झाल्या... 
 
त्यातील पहिली कथा होती "रेको (अर्थात रेकमंडेशन)- ती कथा मी महाभारतातील आदिपर्वातील धौम्य ऋषी आणि त्यांचा शिष्य आरुणी यांच्या वर आधारित लिहली होती..
 
आरुणी बांधाचे पाणी स्वतः झोपून अडवतो कारण त्याला गुरुजींचे अमेरिकेत जाणयासाठी रेकमंडेशन हवे असते!... माझ्या आय आय टी तील वर्षांचा आणि तेथील विद्यार्थ्यांच्या वागणुकीचा आणि जी.एं. च्या पिंगळावेळचा त्यावर प्रभाव होता... (अभिरुचीचे अनुक्रमणिका पान आणि कथेची पाने सोबत)
 
दुर्गाबाई म्हणतात :
"... माणसाच्या अध्यात्मिक प्रकृतीवर सूत्रमय भाष्ये करणारे ललित वाङ्मय आमच्याकडे फारसे नाही. पुराकथांच्या रसायनातून जेंव्हा कथा, कादंबऱ्या जन्म घेतात तेंव्हा त्यात ही प्रज्ञा स्वाभाविकपणे प्रकट होते. आपल्याकडे पुराकथांवर आधारित नवे वाङ्मय अजिबात नाही असे नाही. या संदर्भात मला जी. ए. कुलकर्णी यांचे नाव घ्यावेसे वाटते. पाश्चात्य परीकथा व पुराकथा पचवून त्यांचे नवपरिवर्तन आपल्या कथांमधून जेव्हा जी. ए. करतात तेव्हा मनाला खूप आनंद होतो..."
(पृष्ठ १२५, 'शासन, साहित्यिक आणि बांधिलकी', १९८८/२०१८)
 
ज्यावर्षी दुर्गाबाई हे म्हणत होत्या त्याचवर्षी माझी कथा अभिरुचि सारख्या मासिकात प्रसिद्ध होत होती याचे आज खूप समाधान वाटते...