Tuesday, July 11, 2023

GA, Rege@100...सदानंद रेगे, जी. ए. कुलकर्णी १००वा वाढदिवस

#sadanandrege100 #gakulkarni100

जून २१ २०२३ रोजी आपण सदानंद रेगे यांचा १००वा वाढदिवस साजरा केला, जुलै १० रोजी जी. ए. कुलकर्णी यांचा वाढदिवस साजरा केला... 
 
२०व्या शतकातील जगातील दोन उत्कृष्ट, सुदैवाने मराठीत लिहणारे, माझे आवडते लेखक... दोघे तसे कमी जगले- रेगे ५९ वर्षें, जीए ६४... 
 
दोघेही दोन महायुद्धे आणि भारताची फाळणी ह्या मध्ये जन्माला आलेलं आणि त्याच्या प्रत्यक्ष झळा जरी लागल्या नसल्या तरी भाजलेले...
 
दोघांनी भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या समाजवादी धोरणांमुळे आर्थिक चणचण, गरिबी पाहिलेली ... दोघांची आयुष्यात कोणत्याही शहरात स्वतःच्या मालकीची दोन खोल्यांची घरे सुद्धा झाली नाहीत, दोघेही कॉलेजमध्ये प्राध्यापक, दोघांवरही घराची खूप जबाबदारी...
 
दोघेही अविवाहित...
 
दोघांचे जागतिक वाङ्मयाचे उत्तम वाचन, मनन आणि त्याचा त्यांच्या साहित्यावर पडलेला लख्ख प्रभाव... दोघांनी अनके पुस्तकांचे अनुवाद केले... दोघेही उत्तम चित्रकार... पण त्यातून त्यांना एकही पैसा मिळाला नाही...
 
दोघेही चष्मिश...
 
दोघेही मराठीतील सुधारणावादी, पुरोगामी, जगाला-सुधरवून-सोडतो वगैरे लेखनापासून प्लेटो इतके दूर...
सर्व लक्ष मानवाच्या लाखो वर्षें चालत आलेल्या जीवनाकडे, त्यातील संघर्षाकडे , त्याच्या मर्यांदांकडे, त्याच्या महत्वाकांक्षेकडे, त्याच्या छोट्या-मोठ्या सुखदुःखाकडे, जीवनात सतत तयार होत असलेल्या विनोदाकडे, जगाच्या सतत दिसणाऱ्या सौन्दर्याकडे, नियती कडे...
 
रेगे अत्यंत महान कवी, जीए सुप्त कवी.... रेगे नाटककार...जीए थोर कथाकार... दोघेही भाषाप्रभु, त्यांच्या परिने मराठी घडवली... 
 
दोघेही त्यांच्या वाङ्मयीन वाटेच्या सुरवातीला केळकरांच्या "वाङ्मय शोभा"चे लेखक (रेगे तर नंतर काहीकाळ सल्लागार सुद्धा) आणि केळकरांचे ऋण कधी न विसरलेले, दोघेही नंतर पॉप्युलर प्रकाशनाचे प्रथितयश लेखक...
 
पुन्हा एकदा, थँक यु, सर (स)