तितकी सुंदर हरणे पुन्हा दिसलीच नाहीत...
४० वर्षांपूर्वी FB असते तर त्याने मला आज आठवण करून दिलीच असती, पण त्याची गरज नाही.
मी त्यावेळी आय आय टी मद्रास च्या उत्कृष्ट, स्पार्टन अशा ब्रह्मपुत्रा हॉस्टेल मध्ये रहात होतो, लवकरच शिक्षण संपणार होते आणि थोडे उशिरा आवडायला लागलेले मद्रास- नोकरी थोडक्यात तिथे न मिळाल्याने- सुटणार होते.
ब्रह्मपुत्रा नवीन हॉस्टेल होते, चकाचक, प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्र खोली होती, त्या खोलीला छोटी गॅलरी होती, गॅलरीच्या खाली हरणे जमा होत, मी सर्वात वरच्या तिसऱ्या मजल्यावर होतो...
प्रशस्त कॉमन रूम मध्ये नवीन रंगीत TV होता, आणि त्या टीव्ही वर आम्हाला विश्वचषक बघता आला.... भारतात १९८२ साली (त्या वर्षाच्या भारतातील ASIAD मुळे) रंगीत टीव्ही आला होता आणि फार कमी लोकांकडे तो होता...
शेवटच्या काही ओव्हर मी पाहू शकलं नाही कारण मी इतका अस्वस्थ झालो होतो, मी वर माझ्या खोलीच्या बाहेर, ज्याच्या खालीच ग्राउंड फ्लोवर वर कॉमन रूम होती, तिथे उभा राहून मॅच जिंकल्याचे ऐकले आणि सगळीकडे, अलीकड सारखा नाही, पण भरपूर जल्लोष झाला. आणि मी परत कॉमन रूम मध्ये गेलो.
त्यावेळी मला ODI क्रिकेट प्रचंड आवडत होते, आता कित्येक वर्षे ते आवडत नाहीये.
सुनील गावसकर यांच्या १९७१ च्या भारताच्या टीम मधील पदार्पणाने भारतीय क्रिकेट मध्ये एक प्रचंड आत्मविश्वास आला होता आणि कपिल देव यांच्या मुळे त्यात आणखी वाढ झाली होती.
तेच यश आपल्याला एक देश म्हणून विविध क्षेत्रात मिळायला अजून काही वर्षे जायची होती.
२५ जून १९८३ ची ती ब्रह्पुत्रातील संध्याकाळ अशी कायमची मनात घर करून आहे...