Tuesday, September 08, 2020

सर्वमंगल आनंदी आनंद...H V Mote's Autobiography

फार पूर्वी विकत घेतलेले पुस्तक (त्याच्या दोन प्रती माझ्याकडे चुकून झाल्या आहेत) अलिकडे वाचायला सुरवात केली. प्रकाशक मोटे यांच्या बद्दल मला खूप आदर आहे. त्यांच्या मुळे मला समग्र शेजवलकर लेख, विश्रब्ध शारदा पत्रे अशी पुस्तके संग्रही ठेवून वाचता आली.

हरी विष्णू मोटे:
" १९२८ ते १९३२ च्या सुमारास अनेक कथालेखकांच्या कथा प्रसिद्ध होत. त्यांतील दिवाकर कृष्ण, कुमार रघुवीर, वि. सुखटणकर (सह्याद्रीच्या पायथ्याशी), कमलाबाई टिळक, कृष्णा खरे, बाळूताई खरे, 'कृष्णाबाई' या टोपणनावाने लिहणाऱ्या मुक्ताबाई दीक्षित, या लेखक-लेखिकांच्या कथा मला विशेष आवडत..."

(पृष्ठ ९६, 'हृदयशारदा', 'एक सर्वमंगल क्षिप्रा', १९८०)

हे वाचून मला खूप हसू आले.

बाळूताई खरे म्हणजे विभावरी शिरुरकर सोडले तर मी वरील एकही लेखकाचे पुस्तक पहिले नाही व वाचले नाही. विभावरी शिरुरकर यांना सुद्धा खूप कमी वाचले आहे पण त्यांच्या बद्दल वाचले आहे (मोटे, विश्राम बेडेकर, शेजवलकर यांच्या लेखनात आणि अधूनमधून मराठी वर्तमानपत्रात. मला त्यांच्या लेखनात काहीच विशेष वाटत नाही.)

मला खात्री आहे कदाचित विभावरी शिरुरकर सोडल्यातर एकही लेखकाचे पुस्तक सध्या बाजारपेठेत विकत मिळत नसणार.

मराठीची अवस्था अशी का? 

का हे लेखन इतके सामान्य होते की वर्तमानपत्रासारखे एका महिन्यात रद्दीत घालावे? 

ह्या ऐवजी लोक महाभारत, प्राचीन संस्कृत नाटके, गाथा सप्तशती, ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, रामदास वगैरे पुन्हा, पुन्हा का वाचत नव्हते? का हे सगळे आपण पारतंत्र्यात होतो म्हणून? 

पण मग नाट्यछटाकार नाट्यछटाकार दिवाकर, श्री कृ कोल्हटकर, श्री व्यं केतकर, त्र्यं शं शेजवलकर, र  धों कर्वे कसे नाट्यछटा, विनोद किंवा एकाहूनएक उत्तम, द्रष्टे लेख त्या काळात लिहीत होते, जे आजही  उत्सुकतेने वाचावेसे वाटतात?

(btw - मोटे एक दोन वेळा चक्क सांगतात की त्यांनी श्री कृ कोल्हटकर यांचे काही वाचले नव्हते.  म्हणजे हा शिकलेला, तरुण, नवे करू इच्छिणारा प्रकाशक मराठीतील एका सर्वोत्तम लेखकापासून इतका दूर होता!)

 

मुखपृष्ठ बहुतेक द ग गोडसेंचे असावे 

कृतज्ञता : मुखपृष्ठ कलावंताच्या कॉपीराईट होल्डर्स बद्दल