Thursday, September 21, 2017

फक्त एक चित्र काढायच राहीलय: मृत्यूनदी Styx वरील पडावाच, पडावावरून....Sadanand Rege, A Cartoonist, A Painter

#SadanandRege35YearsOn

आज २१सप्टेंबर २०१७, सदानंद रेग्यांची ३५वी पुण्यतिथी 

विलास सारंग , रेगेंवरचा मृत्युलेख:
"... रेग्यांच्या कवितेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिच्यातील विनोद आणिआयरनी. गंभीर कवितेला विनोदाचे वावडे असते अशी गैरसमजूत मराठीत रूढ झाल्याचे दिसते. बहुतांश कविता हीलांब चेहऱ्याची कविता आहे. ‘सीरियसनेस्म्हणजेसॉलेम्निटीनव्हे आणि गंभीर जीवनदृष्टीलाकॉमिक व्हिजनचे वावडे नसते हे फारसे लक्षात घेतले गेल्याचे दिसत नाही...."

सकस विनोद बुद्धी सतत जिवंत असलेला कवी म्हणजे रेगे, अस मी त्यांच वर्णन करेन... एकनाथ, तुकाराम, रेगे, कोलटकर ... विनोदबुद्धीची मराठी कवींची उतरंड.....

त्यांच चौफेर वाचन असाव असं वाटत. त्यात नक्कीच जेम्स थर्बर , स्टाईनबर्ग, न्यूयॉर्करचे, पंचचे  अंक आलेले असणार, शिवाय चित्रकलेची, संगीताची देणगी .... अशा प्रतिभाशाली माणसाला कार्टून काढायचा निश्चितच मोह होणार, विशेषतः आजूबाजूच्या निर्माण होणाऱ्या कार्टून्सचा दर्जा पाहून वाईट वाटल्याने....

रेगेंनी 'वाङ्मय शोभा' मासिकासाठी १९५०च्या दशकात खूप काम केल - अनेक कविता, कथा लिहल्या, संपादकांशी सल्लामसलत (उदा: 'एप्रिल फु' विशेषांक प्रत्येक एप्रिल मध्ये काढण), अंकाच स्वरूप बदलायचा प्रयत्न केला....आणि व्यंगचित्रे काढली....

खाली १९५६, १९५७ साली प्रकाशित झालेली रेग्यांची नऊ व्यंगचित्रे दिली आहेत. त्यासालातील दि न्यू यॉर्कर किंवा पंच मध्ये प्रसिद्ध झालेल्या व्यंगचित्रांच्या मानाने काही  ठ्ठीक आहेत, काही चांगली (उदा: शेविंग , जेकील आणि हाईड) आहेत अस म्हणता येईल

पण मला त्यांचा प्रयत्न पहिल्या दर्जाचा वाटतो. मराठीतील एक आघाडीचा कवी कार्टून काढतो ही त्या कवीने व्यंगचित्रकलेला दिलेली मोठी दाद आहे. (जीए , दिलीप चित्रे यांनी चित्रे काढली. जी ए वसंत सरवटेच्या कलेला दाद देताना पत्रातून दिसतात. )

सौजन्य: सदानंद रेगेंच्या साहित्याचे सध्याचे कॉपीराईट होल्डर्स, वाङ्मय शोभा, बुकगंगा.कॉम

 (केवढ जबरदस्त चित्र आहे पहा हे....मला रेग्यांच्या व्यंगचित्रात सगळ्यात जास्त आवडलेले )


 (खालील चित्रात रेगेंची नाममुद्रा दिसत नाहीये पण बहुदा चित्र त्यांचेच आहे.)


(खालील चित्र: शीर्षासन केल्यामुळे मुलाचे डोके चपटे झाले आहे, केस झडले आहेत.)



(खालील चित्र:  नाव पहा : डॉक्टर जेकील , कपडे बदलतायत आणि डॉक्टर हाईड होतायत!)
(खालील चित्र: मेलबर्न ऑलीम्पिकस , १९५६)


रेग्यांच्या ह्या व्यंगचित्रकलेचा 'निवडक सदानंद रेगे: संपादक: वसंत आबाजी डहाके', १९९६, २०१३ मध्ये कुठेही उल्लेख मला सापडला नाही (चूकभूल घ्यावी द्यावी).


पुस्तकातील परिशिष्टात समाविष्ट रेगेंच्या वरील लेखात ते स्वतः त्यांच्या Drawing बद्दल लिहतात:

 "... यंदाच्या मुक्कामात माझी कित्येक चित्रे तिथल्या (ओस्लोच्या) मित्रांच्या घरांच्या भिंतींवर लावलेली मी पहिली तेव्हा आयुष्यात प्रथम वाटल, की हे जीवन काही अगदीच निरर्थक नाही....".... फक्त एक चित्र काढायच राहील म्हणतायत:  मृत्युनंतरच्या Styx वरील  पडावाच, पडावावरून  ...

चित्रकलेचे इतके महत्व रेगेंच्या जीवनात आणि कलाजीवनात आहे...

श्री. डहाके रेगेंच्या या पैलूबद्दल त्यांच्या १८ पानी प्रस्तावनेत फक्त खालील उल्लेख करतात: "... पुढे आयुष्याला स्थैर्य आल्यानंतर रेगे संगीताच्या आणि चित्रकलेच्या शिक्षणाकडे वळले. त्यांच्या काही पुस्तकांच्या मुखपृष्ठांवर त्यांनी केलेली रेखाचित्रे , रेखाचित्रे आहेत. उदा...."

माझ्यामते रेगेंच्या कवितांवर जगातील अप्रतिम व्यंगचित्रांचा प्रभाव आहे असं नुसत नाही तर त्यातील काही कविता उत्तम व्यंगचित्रांसारख्या आहेत. 'दि न्यू यॉर्कर', 'पंच'  मधली रेगे लिहीत असलेल्या काळातील व्यंगचित्रे पहा ( काही या ब्लॉगवर सुद्धा आहेत) तुम्हाला माझे म्हणणे कदाचित पटेल. रेग्यांना अनेक वेळा जे व्यंगचित्रातून काढायला जमल नाही ते त्यांनी कवितेतून व्यक्त केल. रेगे हे पहिल्यांदा रंगरेषा-लेखक आहेत आणि नंतर अक्षर-लेखक