Wednesday, August 19, 2026

रवि वर्मा मंदिराचा थंड अंधार आणि उन्हातलं पोस्टर्सचं झाड...My Journey of Love of Visual Art Started There

 माझ्या अगदी बालपणचं मिरज (साधारण १९६४-६९): आजही माझ्या मनात एका छोट्या चौकाच्या रुपात येतं—तिथं एक वाकडा, जेमतेम जिवंत असलेल झाड होत. त्या झाडाला पक्ष्यांचं घरट  नव्हतं, फुलांचा बहर नव्हता, आणि सावली तर कसलीच नव्हती. ते झाड जगत होतं—सिनेमांच्या पोस्टर्ससाठी.

आम्हाला तेव्हा चित्रपट क्वचितच पाहायला मिळायचे; पण काय चित्रपट लागले आहेत/शुक्रवार पासून लागणार आहेत  हे मला नेहमी त्या झाडामुळे समजायचे. ते झाड माहितीचं केंद्र होतं—कुतूहलाचं, कल्पनांचं, आणि न पाहिलेल्या जगाचं.

त्या झाडाच्या मागे पाठीमागेच उभं होतं दत्त मंदिर—दगडी भिंती, उंच छत, जाड दारे, आणि आतल्या थंड कमी उजेडात लावलेली  राजा रवि वर्माच्या चित्रांची जगमगाट. बाहेर मिरजची कोरडी गरम पण मानवलेली हवा, आणि आत थंडगार शांती; बाहेर झगझगीत पोस्टर्स, आत पौराणिक सौंदर्य.

माझ्या आयुष्यात दृश्यसंस्कृतीचे हे दोन ध्रुव एकाच ठिकाणी भेटले—रवि वर्माच्या सौंदर्याचा अंधारातला श्वास आणि हिंदी/मराठी  सिनेमाच्या रंगीबेरंगी स्वप्नांचा गोंगाट. आज मागे वळून पाहताना वाटतं—हा चौक माझ्या आयुष्याचा पहिला कला-दालन होता, जिथे ‘उच्च’ आणि ‘लोकप्रिय’ कलेत काहीच भेद नव्हता.

आई आम्हाला जवळच्या बागेत घेऊन जायची, दत्ताच्या देवळात घेऊन जायची आणि माझी नजर नेहमी त्या झाडाच्या दिशेने प्रथम  फिरायची. 

आणि मग मंदिरातली चित्रं. रवि वर्माच्या प्रतिकृती महाराष्ट्रभर पसरलेल्या आहेत, पण त्या दगडी भिंतीवरील प्रतिमा माझ्यासाठी केवळ देव नव्हत्या—त्या रंगरेषांची भाषा होती, शांततेची आणि भव्यतेची ओळख होती. बाहेर पोस्टर्सच्या जगात नायकांच्या मुठी उंचावलेल्या, नायिकांचे दिलखेचक अविर्भाव, थोडक्या जागेत निर्माण केले गेलेलं सिनेमाबद्दलच आकर्षण; आत मात्र गजगौरींची प्रसन्न नजर, लक्ष्मीचा कोमल अंगकाठीवरचा प्रकाश, आणि राम-सीतेच्या चेहऱ्यांवरील अखंड संयम. 

त्या चौकात माझ्या डोळ्यांसमोर दोन भारत उभे राहत—एक आदर्शांच्या संगमरवरी शांततेतला, आणि एक रंगीबेरंगी स्वप्नांच्या गोंगाटातला. 

हे दोन्ही अनुभव—रवि वर्म्याच्या सौंदर्य-दर्शनाचा थरार आणि पोस्टर कलाचा आवेश—माझ्या आत काही तरी मूलभूत रोवून गेले. कदाचित आजही मला रंग, दृश्यं, नर्तक, नायिका, दृश्यकला, किंवा दीनानाथ दलाल यांच्या चित्रांचा शृंगार—सगळं इतकं जिवंत का वाटतं—त्याचं उत्तर त्या चौकात दडलेलं आहे.

“वेड्याचं घर उन्हात.” खरंच, भारतात सिनेमा हे एक सार्वजनिक वेड आहे—उन्हात, धुळीत, गर्दीत उभं राहून आपण त्याचं स्वप्न बघत आलो. चित्रपट पाहिला की नाही हा प्रश्न नव्हता—पोस्टर पाहणं हीच एक घटना होती.

आज आपण काही जण म्हणतो की लोकप्रिय कला ही ‘कमी दर्जाची’ आणि शास्त्रीय कला ‘उच्च दर्जाची’. पण माझ्या बालपणाने मला एका गोष्टीची शिकवण दिली—दृश्यकला ही श्रेणींमध्ये विभागायची नसते. ती अनुभवायची असते. रंग हे समान असतात—देवळाच्या भिंतीवर असो किंवा चौकातील झाडावर.

म्हणूनच आजही मी त्या क्षणाकडे परत जातो—उन्हात उभ्या पोस्टर्सच्या झाडापाशी, आणि थंड दगडी मंदिराच्या अंधारातल्या रवि वर्म्याकडे.

कला हे दोन्ही आहे—उन्हाचा झगमगाट, आणि अंधाराची शांती. आणि त्या चौकाने मला दोन्ही भेट दिलं. त्या चौकाने मला शिकवलं — कला जिथे आहे तिथे जीवन खोल होतं.


 Art imagined and drawn by ChatGPT