माझ्या लहानपणी (१९६९-१९७५) हिंदीची फार चलती मुंबई बाहेरच्या पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा होती...
अधिकृत चलती म्हणजे आम्हा मुलांना एका पाठोपाठ एक हिंदी परीक्षा देण्यासाठी केले जात असलेले शाळेतून आवाहन... मी हिंदी 'बालबोधिनी' परीक्षा उत्साहाने दिली पण मला हिंदी भाषा आवडत नसल्याने 'पहिली' परीक्षा कशीबशी दिली आणि तो प्रकार संपवला ...
अर्थात ती नुसती अधिकृत नव्हती , लोक हिंदी मासिके (उदा मनोहर कहानियाँ) , गुलशन नंदा (तत्सम लेखक मराठीत उदयाला त्यातूनच आले) यांच्या सारखे लेखक (त्यांच्या जाडजूड पॉकेटबुक्स) मोठ्या प्रमाणावर वाचत असत, त्यामुळेच 'दीपावली' मासिकाच्या हिंदी वार्षिकाचा उदय झाला असावा...
त्याचे एक कारण मराठी म्हणजे तेंव्हा माफक दारात लोकप्रिय असे वाचायला कमी मिळत होते ...
आम्ही लहान मुले सुद्धा वाचायला हपापले होतो पण फक्त स्वस्त असे चांदोबा मासिक आणखी छोटीछोटी पुस्तके मिळत असत... कॉमिक्स भारतात इंद्रजाल कॉमिक्स सुरु होईपर्यंत मिळत नव्हती ... आणि इंद्रजाल फक्त दोन-तीन सुपरहीरोच छापायचे ... ती पुस्तके मी कोल्हापूरला माझ्या मावशीकडे वाचली... इतर गोष्टीची पुस्तके होती आणि मला ती सुदैवाने खूप वाचायला मिळाली पण सगळे महाग असायचे ... कारण छापलेला कागदच महाग होता...
माझ्या वडिलांमुळॆ मी इंग्लिश पुस्तकांकडे सुद्धा वळलो होतो आणि आमच्याकडेच त्याचा मोठा संग्रह होता ...
बरेच जण वाचनालये ऍक्टिव्हली वापरत असत, मी तर डिटेक्टिव्ह पुस्तके (काशीकर, नाईक, शिरवळकर...अर्नाळकर मात्र नाही कारण ते मला बोअर व्हायचे) वाचून, वाचून मिरजेतील एक दोन लायब्ररी संपवल्या होत्या ....
सौजन्य आणि आभार :
महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्था, चित्रकार दीनानाथ दलाल मेमोरियल समिती, दलाल परिवार
