Tuesday, August 19, 2025

इसवी सन कवायत आणि मर्ढेकरांची कविता ...My Mardhekar's Poetry Journey from 1977

 बाळ सीताराम मर्ढेकर : 
"... अन्  इसवी सन कवायतीचा / कदम उचलुनी पुढें सरकला. ..."
 (७, पृष्ठ ७९, मर्ढेकरांची कविता , १९५९-१९७७)
 
इसवी सन किती कवायत करत पुढे गेला आहे हे ह्या पुस्तकावरून समजते ...

१९७७ ची आवृत्ती असलेले पुस्तक , मी मिरजेला रत्नाकर बुकस्टॉल (शहा : दोन भाऊ आणि त्यांचे वडील दुकानात असत, त्यातील एक भाऊ वारला असे समजले, तो माझा आवडता होता) , ह्या प्रेमाने पुस्तके विकणाऱ्या, दुकानातून माझ्या बारावीच्या वर्षात, १९७७ साली, विकत घेतले ... ते माझ्या सोबत चेन्नाई ते डुमडुमा, आसाम आणि मधल्या सर्व ठिकाणी होते... बायको नसेल पण मर्ढेकर होते !
 
मर्ढेकर ("गणपत वाणी") मला १९७४-७५ पासून, त्यांनी माझ्या नव्या दहावीच्या पाठयपुस्तकांत प्रवेश केल्यापासून, आवडायला लागले होते .... पाठयपुस्तकातील त्यांची प्रत्येक कविता (फलाटदादा, भंगूदे ... ) मला पाठ होती ....
मर्ढेकरांचे जवळचे मित्र असलेल्या मौजेच्या श्री पु भागवतांचे मर्ढेकरांवरचे व्याख्यान मी सांगली रेडिओ वर शालेय आकाशवाणी या कार्यक्रमात अतिशय क्षीण अशा आवाजात १९७६-७७ या वर्षी ऐकले होते... (सांगली स्टेशन सुद्धा मिरजेत सकाळी १०  , ११ ला चांगले लागत नसे)... त्यात श्रीपुंनीं सांगितले 'चंद्रकिरणांनो , तुम्हां' या "शिशिरागम" मधील २०व्या कवितेत मर्ढेकरांना त्यांचे व्यक्तिमत्व सापडले,आजही त्या पानावर मी तशी केलेली नोंद दिसते आहे...त्या एका भाषणात श्रीपुंनी मला मर्ढेकर कसे अनुभवायचे हे दाखवले.... 
 
त्यानंतर मी पुस्तक लवकरच विकत घेतले आणि कोणालाही अर्थ न विचारता ते वाचायला लागलो, त्याचे काठिण्य माझ्या लेखी भंगू लागले , कविता गुणगुणायला लागलो ... ते आजवर
 
 
 
मुखपृष्ठ : अरुण घाटे  किंमत: तेरा रुपये 
 
आवृत्ती : १९५९, १९६९, १९७७