Sunday, October 27, 2024

मागें वळूनि पाहणें विसरलीस का? माधव विश्वनाथ धुरंधर यांची पाठमोरी पौर्णिमा...Sublime Beauty in Visual Art of 19th Century Maharashtra

बा सी मर्ढेकर;
"...
अडलिस आणिक पुढें जराशी
पुढें जराशी हंसलिस;
___मागें
वळूनि पाहणें विसरलीस का ?
विसरलीस का हिरवे धागे ?
..."
(२५, पृष्ठ ९६, मर्ढेकरांची कविता, १९५९-१९७७)

(बा भ बोरकरांची 'पाठमोरी पौर्णिमा' ही सामान्य कविता आहे पण त्याचे शीर्षक आवडल्याने ते पोस्ट च्या शीर्षकात घातले.)

माझी माझ्या फेसबुक वरील दीनानाथ दलाल पेजवरील मार्च १२ २०२४ ची पोस्ट:

आज एक विलक्षण चित्र, अगदी वेगळे, मी पहिल्यांदा पाहिलेले, पण त्याचे सौन्दर्य मनातून कधी हटणार नाही असे, 
 
कमरेवर कळशी घेतलेली, संपूर्ण पाठमोरी, नववारी खणाचे लुगडे आणि चोळी नेसलेली मराठी स्त्री ... माझ्या सुदैवाने माझ्या लहानपणी मी अशी स्त्री प्रत्यक्षात काहीवेळा तरी पहिली आहे .. 
 
लुगडे इतके छान नेसले आहे की तो नेसण्याचा वस्तुपाठ ठरावा , केसांचा छोटा जुडा/ अंबाडा , गळ्यात बेताचे मंगळसूत्र असावे , दोन्ही हातात बहुदा काचेच्या बांगड्या, लहान चण, एकूण नेटकेपणा मन भारून टाकणारा... 
 
त्यांचा तोल बघा, त्या उजव्या उचलेल्या टाचेने तो अगदी परिपूर्ण साधला आहे.
 
आज १३१ वर्षानंतर ह्या बाई मागे वळून आपल्या समोर आल्यातर!
 
ह्या चित्राबद्दलच्या माहितीवरून समजते की ही स्त्री एका तत्कालीन माळीबुवांची पत्नी होती आणि ती कळशी मातीची आहे. 
 
ह्या चित्रावर मराठीत कविता कशा लिहल्या गेल्या नाहीत याचे सुद्धा मला आश्चर्य वाटते.  
 
१९व्या शतकात मराठी चित्रकला कोणत्या उच्च स्तराला पोचली होती याचे एक उदाहरण म्हणजे हे चित्र असे मला वाटते. 
 
कलाकार: रावबहादुर माधव विश्वनाथ धुरंधर ( १८ मार्च १८६७ - १ जून १९४४ )  
 
 चित्राची तारीख : जी खाली उजव्या कोपऱ्यात बरीच दिसती आहे, १८९३
 

 हे चित्र मला इतके आवडले की तसे आणखी कुठले चित्र आहे का ते मी शोधले, त्यावेळी मला डाली यांचे हे चित्र सापडले आणि ते पाहून मला धुरंधर यांचे चित्र किती महान आहे हे जास्त जाणवू लागले... 


Salvador Dali, Sitting girl seen from behind, 1925