Monday, March 04, 2024

बन बांबूंचें पिवळ्या गातें, आकाशांतिल बिनाकागीतमाला;...Unparalleled Success Called Binaca Geetmala

माझ्या लहानपणी लांब कोळीष्टकासारखी दिसणारी एरियल रेडिओ साठी घरात लावली जात असे, तत्पूर्वी काही वर्षे रेडिओ साठी घराच्या बाहेर पिवळ्या, बांबू पासून बनवलेल्या एरियल  लावल्या जात असत... म्हणून मर्ढेकर म्हणतात बन बांबूंचें पिवळ्या गातें...

बा सी मर्ढेकर: 

"बन बांबूंचें पिवळ्या गातें 

आकाशांतिल अधोरेखितें;

..." (२, पृष्ठ ७४, मर्ढेकरांची कविता, १९५९-१९७७)

मी:

"बन बांबूंचें पिवळ्या गातें 

आकाशांतिल गीतमाला;

..."

फेब्रुवारी २० २०२४ रोजी अमीन सयानी वारले आणि माझ्या मिरज येथील लहानपणाच्या अनेक गोष्टी समोर आल्या.... 
 
बिनाका गीतमाला (१९५२-१९८८) काय गगनचुंबी प्रकार होता हे आज बऱ्याच लोकांना समजणार नाही...आम्ही मिरजेला रहात असताना, जवळजवळ १९८५ साल पर्यंत, तो दर बुधवारी रात्री 8 ते 9 मध्ये होणारा रेडिओ सिलोन वरील कार्यक्रम, आयुष्याचा अविभाज्य भाग होता...
 
बहुतेक प्रत्येक घरात-दारात तो कार्यक्रम चालू असल्यामुळे, त्याचा एक प्रतिध्वनी तयार होऊन सबंध अंतराळात त्याचा आवाज घुमत असे (म्हणून गगनचुंबी)....दूरदर्शन वरती नंतर अनेक लोकप्रिय कार्यक्रम झाले पण बिनकाची लोकप्रियता (भारतातील किती टक्के लोक तो ऐकत असत ह्या आधारावर) त्यांनी कदाचित गाठली नसावी...
 
बिनाका हे हिरव्या रंगाच्या, किंचित महाग टूथपेस्ट चे नाव होते...गाण्याच्या मधून येणाऱ्या बिनाका च्या जाहिराती (जिंगल्स) मला खूप आवडतं असत....एक होती "हे-हे- बिनाका ग्रीन, बिनाका ग्रीन... हे-हे- बिनाका ग्रीन, बिनाका ग्रीन"...त्याच्या आठवणीने सुद्धा बरे वाटते...बिनाका महाग असल्यामुळे आम्ही ती क्वचितच विकत आणली, आम्ही कोलगेट टूथपेस्ट आणि टूथ पावडर वापरत असू..
 
माझी तत्कालीन हिंदी गाण्यांची आवड १९७७ नंतर कमी होऊ लागली पण धाकटा भाऊ आणि बहीण मात्र जेवणाचे ताट घेऊन आमच्या माडीवर जाऊन तिथे ठेवलेल्या आमच्या रेडिओ पाय (ब्रँडचे नाव) वर तो कार्यक्रम लक्ष देवून ऐकत असत....
 
अमीन सयानी अतिशय उत्तम समालोचक होते पण कधी कधी जरा ते जास्तच भाऊक होऊन नाटकी बोलत असतं...त्यांच्या काळात काही वादग्रस्त गोष्टी सुद्धा झालेल्या आहेत... त्यांच्यावर आरोप झाले होते की काही संगीतकारांना आणि त्यांच्या गाण्यांना प्रमोट करत असत... इसाक मुजावर या माझ्या आवडत्या लेखकाचा  लेख आठवतो... ( I wrote on Feb 27 2015 on FB after Mr. Mujawar had died: I remember his longish article in one Diwali number of 'Rasrang': 'Victims of Hammer music' (हॅमर म्यूज़िकचे बळी) where he rued how the 'old' music directors like Anil Vishwas, Roshan, Madan Mahan etc fell prey to Binaca style publicity verging on propaganda....for him, it was big time fixing....).  
 
सयानी एक पूर्णतः व्यावसायिक होते आणि राहिले, त्यांच्या मुळे हिंदी सिनेसंगीताचे भले झाले, त्याचा दर्जा वाढला असे मी म्हणणार नाही...
 
बिनाका गीतमाला हे पर्व सगळ्या पर्वांसारखे आता सर्वार्थाने संपले..
 
दीनानाथ दलालांची सोबतच्या चित्रातील नायिका सुद्धा बिनाका ऐकत आहे असे वाटते पण ते चित्र जानेवारी १९४७ चे आहे!
 
कृतज्ञता: श्री दलाल यांच्या कलाकार्याचे कॉपीराईट होल्डर्स