Sunday, February 18, 2024

माझे तळे परत येणार नाही हे नक्की...At a Bend in the Ganges

ऑगस्ट २०२३ मध्ये आर्थर गेट्झ (Arthur Getz) यांचे ऑगस्ट १९६६ चे न्यू यॉर्कर चे मुखपृष्ठ पहिले आणि मला माझ्या १९६६ च्या सुमाराच्या वर्षांची आठवण झाली. 

त्या आठवणींच्या केंद्रस्थानी आहे मिरजेच्या पूर्वेला असलेले तासगाव वेशीच्या मारुतीचे देऊळ (मिशन हॉस्पिटल ते मिरज मेडिकल कॉलेज ह्या रस्त्यावर) आठवले. ते आमच्या घरापासून लांब होते. ३ किमी तरी असावे. आमची आई आम्हाला तिथे केंव्हातरी घेऊन जायची. आम्ही पायी जायचो. त्यामुळे ते आमच्या लहान मुलांच्या कुटुंबाला पोचायला नक्कीच अवघड होते.  

त्या छोट्या देवळाच्या शेजारी एक उथळ पण स्वछ पाण्याचे तळे होते. तसे मोठे होते. मी तिथे सोबतच्या चित्रातल्या मुलाप्रमाणे दगड टाकून पाण्यावर भिंगऱ्या काढायचो. प्रत्येक फेकीत दोन-तीन तर अगदी सहज निघत असत. 

तो भाग त्याकाळी निर्मनुष्य होता. रस्त्यावर वाहन, आवाज क्वचितच असे. तिथे जीव इतका रमत असे की (भूक लागली नसेल तर) परत यायला नको वाटे. 

आता तो भाग मला ओळखता तर येत नाहीच पण अतिशय विद्रुप झाला आहे, देऊळ आहे पण तळे नाहीसे झाले. या पुढे पृथ्वीचे काय होणार माहित नाही पण मी असे पर्यंत माझे तळे परत येणार नाही हे नक्की.