Wednesday, December 20, 2023

१९७३ चा ऑइल शॉक आणि आमची फरफट ...How The Oil Shock of 1973 Affected Our Family and Mad Max 2

ह्या वर्षी ५० वर्षे झाली ... १९७३ च्या ऑइल शॉकला... 

आमचे पाच जणांचे कुटुंब त्यावेळी मिरजेस रहात होते. आम्ही lpg कनेक्शन अजून घेतले नव्हते. त्यामुळे आम्ही रॉकेल आणि कोळश्यावर घरातल्या इंधनासाठी अवलंबून होतो. 

मला नेमके कारण आणि त्याची व्याप्ती माहित नाही पण आम्हाला कोळसा मिळणे त्या सुमारास बंद झाले. मला वाटते पर्यावरणासाठी कुठलातरी निर्णय घेतला गेला असावा आणि त्याची अंमलबजावणी त्यावेळी सुरु झाली असावी. त्या मुळे आमच्या घरातील कोळश्याची शेगडी आणि चूल दोन्ही बंद पडल्या. 

आता आम्हाला रॉकेलला पर्याय उरला नव्हता. रॉकेल मिळाले नाही तर घरात काहीच शिजणार नव्ह्ते. पाणी तापणार नव्हते. आणि त्यात ऑइल शॉक.... 

असे म्हणतात की सरकारने पेट्रोलचे दर प्रचंड वाढवले आणि डिझेल आणि रॉकेलचे वाढवले नाहीत. असेल. पण अचानक (कदाचित वरील निर्णयामुळे) रॉकेल बाजारातून नाहीसे व्हायला लागले. 

मिरजे मध्ये एखाद्या दिवशी कुठे रॉकेल मिळत असेल ह्याचा काहीच भरवसा उरला नाही. केंव्हा रॉकेल लागेल याचा अंदाज बांधून त्याच्या आधी चार दिवस पायपीट सुरु,  ते मिळवण्यासाठी. प्रत्येक दुकानात जाऊन विचारायचे.

सुदैवाने रॉकेल न मिळाल्यामुळे घरी स्टोव्ह पेटला नाही असे कधी झाले नाही पण ती अनिश्चितता भयानक होती. ती किती महिने राहिली हे आता आठवत नाही. 

कोळसा मिळायचा बंद झाल्यामुळे आमच्या वर आणीबाणी ची वेळ आली आणि पुढे दोन वर्षात आणीबाणी सुद्धा आली!

ज्यावेळी नंतर "Mad Max 2", 1981 (After a global war resulted in widespread oil shortages, civilization collapsed, and the world descended into barbarism.) हा सिनेमा बघितला , त्यावेळी त्यातील पेट्रोल मिळवण्याची तडफड  बघून मला १९७३ -७४ काळातील आमची केरोसीन मिळवायची धडपड आठवत असे!