Sunday, December 17, 2023

मिली- सेंटी- डेसी - मीटर- डेका - हेकटो- किलोमीटर...Metrication and Decimalisation in My Life

 

मी चौथीत असताना, १९६८-६९, महाराष्ट्राने  नवीन दशमान आणि मेट्रिक पद्धत मराठी शाळेमधून जोरात अमलात आणायला सुरवात केली ... 
 
आणा गेला, चार आणे (२५ पैसे) , आठ आणे (५० पैसे) आले... १६ आणे फक्त भाषेत राहिले , व्यवहारात १ रुपया आला...आणा गेल्यानंतर त्याच सुमारास बाजारात एक पैशाचे छोटे नाणे आले, त्या शिवाय दशमान पद्धत पुरी होऊ शकत नव्हती (१-२-३-५-१०-२०-२५-५०-१०० पैसे अशी नवी मालिका होती), त्याला "नवा पैसा" म्हणत, तो पटकन वाक्प्रचारात पण शिरला: "एक नवा पैसा सुद्धा देणार नाही"...
 
मैल/कोस गेले किमी आले... शेर/ मण गेले किलोग्रॅम आला/ लिटर आले... यार्ड/ वार गेले मीटर आला (फक्त साडीत वार राहिलाय)... फूट/ इंच जाऊन सेंटीमीटर/ मीटर काही प्रमाणात आले... एकर जाऊन हेक्टर अजून पूर्णपणे आलेल नाही... फॅरनहिट गेले सेंटीग्रेड आले ...
 
तोळा जायचा होता आणि १० ग्राम यायचे होते पण तो मात्र अजून राज्य करतो आहे...
 
मी कधी जुने measurements फारसे व्यवहारात आणि शाळेत वापरले नाहीत... मराठीतील जुने साहित्य वाचताना नवीन लोकांना अडचण येते कारण कोणी ह्या बद्दल पुस्तकाच्या सुरवातीला बोलत नाही....
 
आता ज्यावेळी दशमान पद्धत शिकवली गेली, त्यावेळी आम्ही हे गाणे डझनावारी मोठ्यांदा म्हणत असून "मिली- सेंटी- डेसी - मीटर- डेका - हेकटो- किलोमीटर" , हेच वजनाबाबत थोडे बदलून, हेच द्रव्याबाबत थोडे बदलून ... 
 
मी आजवर आयुष्यात डेसी, डेका आणि हेक्टो वापरलेले नाही , फक्त अंकगणितात वापरले!
 
आता दशमान पद्धत केवढी व्यापक आहे हे शेजारच्या चित्रात पहा...