Friday, October 02, 2020

चांदोबा मासिकाचे के सी सिवासंकरन...Vampire Stories' Indian Illustrator

 लहानपणी (१९६८-६९ च्या पुढे) घरी विकत घेऊन किंवा बाहेर कुठेतरी , 'चांदोबा' मासिक नेहमी पाहण्यात यायचे.... (माझ्या वडिलांना चांदोबा अजिबात आवडत नसे त्यामुळे आम्ही तो कधी नियमित विकत किंवा वर्गणी लावून घेतला नाही. मात्र किशोर मासिक launch झाल्यावर त्याचे पहिल्या अंकापासून  काही वर्षे आम्ही वर्गणीदार होतो.)....

चांदोबा हे त्याच्या काळात (म्हणजे कित्येक वर्षे) मराठीतील सर्वात जास्त लोकप्रिय मासिक असावे....बाबुराव अर्नाळकर, एस एम काशीकर , गुरुनाथ नाईक इत्यादी यांच्या रहस्य कथांच्या कित्येक पट चांदोबा खपत आणि वाचला जात असावा .... कित्येक साक्षर, नवसाक्षर लोक (प्रौढ, वृद्ध, तरुण, बाल, स्त्री, पुरुष, transgender, सर्व जात, धर्म ,गरीब, श्रीमंत) एकच पुस्तक वाचायचे: चांदोबा!..... चांदोबा (वर्तमानपत्रा सारखा) वाचुन घेतला जात असल्याचे सुद्धा मी पहिले आहे.....

आणि मजा पहा, हे मासिक चेन्नाई मध्ये तयार आणि वितरीत व्हायचे.... आणि ते जवळजवळ सगळे अनुवादित असायचे .....(कै. वि स खांडेकर हे नाव तमिळनाडूत लोकांना तामीळ माणसाचे नाव वाटायचे इतके खांडेकर तिकडे माहित होते आणि इकडे चांदोबा इथला होऊन राज्य करत होता)....कोण म्हणते मराठीत अनुवाद लोकप्रिय नाहीत?.....

आणि त्यामुळे त्यातील चित्रे नेहमी थोडी गंमतशीर वाटत...मी लहानपणी मिरजेला, म्हणजे कर्नाटकाच्या सीमेवर जरी रहात असलो तरी तसे कपडे घातलेले , केशभूषा असलेले, दागिने घातलेले स्त्री-पुरुष मला कधी दिसायचे नाहीत! माझी आई काहीशी दीनानाथ दलालांच्या चित्रातल्या स्त्रियांसारखी दिसायची, चांदोबातल्या स्त्रियांसारखी नाही....चांदोबातील पुराणातील पात्रे सुद्धा राजा रविवर्मांच्या चित्रांहुन (जी अनेक आमच्या जवळच्या दत्ताच्या देवळात लावलेली होती) वेगळी वाटत....

पण कधी मद्रास कडचा सिनेमा बघितला, उदा: तीन बहुरानियां, १९६८, की वाटायच हलता चांदोबा बघतोय .... पण त्या स्त्रीया आकर्षक मात्र वाटायच्या... हे चांदोबाच्या कलाकारांचे यश होते....

१९८१साली ज्यावेळी मी मद्रास ला शिकायला गेलो त्यावेळी गिंडीहून दोन-तीन बसेस बदलून चांदोबाच्या ऑफिस च्या बाहेर पर्यंत वडापलानीला जाऊन आलो .....(मद्रास मध्ये चांदोबातल्यासारखे स्त्री पुरुष दिसायला लागले होतेच!)

चांदोबा आता इतिहासजमा झालेला आहे...आणि ते प्रचंड लोकप्रिय होण्यास कारण ठरलेला त्यातील एक महत्वाचा चित्रकार सुद्धा आता काळाच्या पडद्याआड गेला आहे. 

१९२४ साली जन्मलेले, के सी सिवासंकरन उर्फ संकर सप्टेंबर २९ २०२० ला वारले. 

त्यांचे अत्यंत गाजलेले चित्र म्हणजे मासिकातील विक्रम-वेताळ ह्या कथामालेसाठी त्यांनी काढलेले theme illustration. किती वर्षे मी हे चित्र पहिले असेन!


 

 Chitravarnika and her father Shaktiteja from the series Vikram Vetal, Chandamama, 2007

 Artist: सिवासंकरन (शंकर)

courtesy: copyright holders of the late Mr.  KC Sivasankaran's work