Thursday, June 25, 2020

कधीच न संपणारे सांगली आकाशवाणीवरचे 'हम होंगे कामयाब'...The Emergency@45

४५ वर्षांपूर्वी , जून २५ १९७५ रोजी, आज देशात आणीबाणी लावली गेली.

त्यावेळचे माझे ११-१२ वीचे अस्वस्थ करून टाकणारे दिवस (काहीसे कोरोनामुळे आत्तासारखेच) मला आठवतात (माझ्या डोळ्यादेखत माझ्या मित्राला अटक झाली)...शिस्तीचे मला माहित नाही पण दहशतीचे वातावरण पहिले कित्येक महिने तयार झाले होते.....

गरुडपुराणासारखे सांगली आकाशवाणीवर 'हम होंगे कामयाब' रट लावत असे ...

ज्यावेळी मी पुढे 'जाने भी दो यारों' सिनेमात ती दोघे (नसीरुद्दीन शाह, रवि वासवानी) ते गाणे म्हणत शेवटी फासावर जातात हे पहिले त्यावेळी सर्वात जास्त हसू आले....(त्यांनी विनंती केली असेल की ह्या गाण्यापेक्षा आम्हाला फासावर चढवा !)....

अध्यक्षीय भाषण : दुर्गा भागवत , कऱ्हाड साहित्य संमेलन, १८ नोव्हेंबर १९७५:
"...सांगण्याचा हेतू काय की, माणसाची स्वत्वाची स्वतःच ठरवलेली कसोटी असल्याशिवाय सर्वसामान्य लोकांच्या नाममात्र कसोट्यांवर भिस्त ठेवून लौकिक यश कितीही पदरात पडलं, तरी त्यामुळे त्या तथाकथित विचारवंताला भविष्यकाळाचं निदान करणं जमत नाही. भविष्यकाळात बघण्याची दृष्टी असल्याशिवाय कुठलीही मानवी समस्या खऱ्या रितीनं आकलन करणंही शक्य नसतं. उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी, आपला व समाजाचा अभिमान व अस्मिता टिकवण्यासाठी संघर्षमय इतिहासाच्या अनुषंगानंच बुद्धिजीवी माणसं वर्तमान परिस्थितीचं वास्तवदर्शन घेऊ शकतात, आणि आपला रास्त अभिमान कायम राखू शकतात. 'स्वतःच्या लायकीच्या जाणिवेतच आपली खरी सुरक्षितता असते' हे ट्रूमिनचं वाक्यदेखील या संदर्भात विसरता येत नाही..."