Monday, December 02, 2019

अपोलोमय वर्षात ऑस्ट्रेलियावरच्या विजयाची गुढी.....Victory Against Australia Crowned My Happy 1969

वयानुसार माझ्या या दिवसाच्या आठवणी क्षीण होत चालल्या आहेत पण तरी त्या अजून आनंद देण्याइतक्या ताज्या आहेत...५० वर्षांपूर्वी या दिवशी भारताने ऑस्ट्रेलिया ला दिल्ली च्या टेस्ट मध्ये पराभूत केले...

१९६८-६९, माझे भारत भूषण, मिरज या  प्राथमिक शाळेतील चौथीतील वर्ष समाधानकारक नव्हते. त्या वर्षी मला ती शाळा आवडत नवहती. शिक्षक आवडत नव्हते. पण जसा मी मिरज हायस्कुल ला पाचवीला गेलो तशा गोष्टी झपाट्याने बदलल्या.  मला शाळा आवडत होती. बहुतेक शिक्षक आवडत होते. वर्गातील बसायचे बेंच आवडत होते, वर्गात येणार लख्ख सूर्यप्रकाश आवडत होता, पेटी-लायब्ररी आवडत होती, मैदान आवडत होते,  चिंचेची झाडे आवडत होती, गृहपाठाच्या वह्या आवडत होत्या, प्रयोगशाळा आवडत होती, पाणी प्यायची टाकी आवडत होती... आणि शाळेतील माझ्या पहिल्याच परीक्षेत (सहामाही) माझा अनपेक्षितपणे पहिला नंबर आला होता.

घरी आर्थिक परिस्थिती 'चांगली' (आम्ही मिरजेचे १% होतो!) होती, खायला-प्यायला उत्तम मिळत होते. लाड करणारी आई होती. मी जरी बारीक असलो तरी तब्बेत चांगली होती. पुस्तके भरपूर वाचायला मिळायची. सिनेमा/ सर्कस अधून मधून. आईवडील कधीही  अभ्यास कर म्हणून मागे लागायचे नाहीत.

१९६९ च्या जुलै महिन्यामध्ये अपोलो ११ चंद्रावर उतरल्यानंतर एक चॆतन्याचे वातावरण मध्यमवर्गीय समाजात , शाळा -कॉलेजात तयार झाले होते. मानव आता जग पादाक्रांत करणार होता, त्याच्या स्वप्नांना सीमाच नव्हती, विज्ञान सगळे प्रश्न सोडवून टाकणार होता... (ह्या सगळ्याचे मागील पन्नास वर्षांत काय झाले ते जाऊदे) ... आणि मी ते विज्ञान शिकायला त्याच वर्षी सुरवात केली होती.

१९७०च्या दशकातील पेट्रोल च्या किमतींचा भडका, भयानक आणि चिकट महागाई, एक अजून न विसरलेला दुष्काळ, आणीबाणी, राजकारणातील विधिनिषेध शून्यता अजून थोडे दूर होते.

Life was good....

आणि त्याच काळात ही संस्मरणीय मॅच वर्षाच्या शेवटी घडली. रेडिओ आणि महाराष्ट्र टाईम्स मधून ती वेळ मिळेल तशी फॉलो केलीच होती. शेवटी तो २ डिसेंबर चा दिवस आला आणि भारताने मॅच जिंकली. नंतरच्या दिवशी शाळेमध्ये वर्तमानपत्रातले वाडेकर आणि विश्वनाथ चे फोटो लावलेला फलक , हार घालून उभा केला होता.

वाडेकर, विश्वनाथ, बेदी, प्रसन्ना तर माझे हिरो होतेच पण हे जग आणि त्यातील माझी शाळा सुद्धा आता जास्त आवडायला लागली होती!




सौजन्य : ESPN cricinfo