Sunday, November 24, 2019

जवळजवळ विस्मृतीत गेलेले माधव जूलियन....Madhav Julian@125

हे वर्ष कै माधव जूलियन यांचे १२५व्या जयंतीचे वर्ष आहे. 

त्यांच्या पत्नीच्या 'आमची अकरा वर्षे', १९४५/ १९९४चे परिशिष्ट वाचून माझ्या लक्षात आले की आता बहुतेक कोणीही  माधव जूलियन वाचत नाही किंवा त्यांचा सहसा उल्लेख सुद्धा होत नाही. त्यांनी लिहलेले एकही पुस्तक आज सहजपणे बाजारात उपलब्ध नाहीये.

सह्याद्री पर्वत रांगांतील आणि जवळपासच्या गांवांतील, माधव जूलियन यांनी केलेल्या कित्येक रोमहर्षक सहलींची (अनेक वेळा कित्येक मैल रात्रीसुद्धा चालत) वर्णने लीलाबाई पटवर्धनांच्या पुस्तकात आहेत. एका वर्णनात तर माधव जूलियन ताऱ्यांची स्थिती बघून किती वाजले असतील याचा अंदाज बांधायचा अनेक वेळा प्रयत्न करतात. पण माधव जूलियन यांनी त्या लेखनाला पुरेसे महत्व एक लेखक म्हणून कदाचित दिले नसल्याने , त्या विषयावरती त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले नाही.

तसे झाले असते तर,  आजच्या कोलमडत्या पर्यावरणाच्या काळात त्या पुस्तकाला  एक विशेष महत्व प्राप्त झाले असते.

समोर दिसत असणाऱ्या (tangible), कंदाचित सामान्य वाटणाऱ्या पण आपल्याला रुची असणाऱ्या गोष्टी दुर्लक्ष करून, कोणत्यातरी abstract, cliched, पारंपारिक गोष्टींवर लक्ष देणे ही भारतीय मनाची जुनी सवय आहे. त्यातूनच मग भुंगा दिसतो पण पाकोळी/फुलपाखरू दिसत नाही. या बाबतीत इंग्लिश टोड, चहा पिणे वगैरे वर लिहणारे जॉर्ज ओरवेल (१९०३-१९५०) आणि माधवराव (१८९४- १९३९) यांची तुलना करून पहाण्यासारखी आहे.

एक महायुद्ध, दुसरे होऊ घातलेले महायुद्ध, स्वातंत्र्य संग्राम, रशियन क्रांती, महा फ्ल्यूची साथ, त्यांना अत्यंत परिचित असलेल्या शिक्षण क्षेत्रात होणारे बदल आणि या सर्वांमुळे भारतीय समाजात झालेली उलथापालथ माधवरावांनी पहिली. त्यांनी त्यावर सुद्धा खचितच लिहायला पाहिजे होते.

माधवरावांनी मराठी भाषा फारसी  भाषेच्या  प्रभावातून बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला असे म्हणतात.  त्याचे २०१९साली काय परिणाम दिसून येतात हे मला माहित नाही पण आता मराठीवरील इंग्लिशचे (आणि हिंदीचे सुद्धा) आक्रमण आणि प्रभुत्व बघता, ते सारे प्रयत्न खेळकर आणि करमणूक वाटतात.

बा सी मर्ढेकरांनी माधव जूलियन यांच्या वर लिहलेली कविता सुद्धा एक असंग्रहित कविता म्हणून मर्ढेकरांच्या पुस्तकात येते. कै प्रल्हाद केशव अत्रे माधव जूलियन यांना रविकिरण मंडळातील रवी म्हणत. आज अत्रे असते तर त्यांनी रवी अस्ताला गेला आहे, असे कदाचित म्हटले असते. माझ्यामते त्यातील एक किरण, दिवाकर (दुर्गा भागवत, विजय तेंडुलकर अशांनी अतिशय कौतुक केलेला) हा मात्र शुक्र ताऱ्याप्रमाणे लकाकतो आहे.

आज माधवराव माझ्या सारख्या सामान्य वाचकासाठी शिल्लक आहेत ते त्यांच्या दोन-चार गुणगुणत्या येणाऱ्या कवितांमुळे.